छत्रपती शिवरायांचे केवळ नाव जरी घेतले तरी संपूर्ण अंगावर शहरे आल्याशिवाय रहात नाहीत. त्यांची कीर्ती, त्यांची थोरवी शतकानुशतके अजूनही तशीच आहे. त्याच उत्साहात आणि त्याच जोशात आजही मराठी मावळ्यांचे रक्त सळसळते. इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या राजांचे नाव आजही अनेक पिढ्यांनंतरही जसेच्या तसेच आहे. प्रत्येक मराठी मावळ्यांच्या तनामनात भिनभिनलेल्या शिवरायांच्या इतिहासाची साक्ष आजही बालचमूंच्या कृतीतून त्याच जोशात आणि उत्साहात आपल्याला पहायला मिळते.
दिवाळी जवळ आली कि बालचमूंना वेध लागतात ते किल्ल्यांचे. बेळगाव शहरात, परिसरात आणि प्रामुख्याने तालुक्यात किल्ला बनविणाऱ्या बालचमूंची संख्या अधिक आहे. शेकडो गड किल्ल्यांची श्रीमंती असलेल्या शिवरायांच्या गडकोटांची इत्यंभूत माहिती आणि हुबेहूब प्रतिमा बालचमूंकडून दिवाळी दरम्यान साकारली जाते. कधी मातीपासून तर कधी सिमेंटपासून! तर कधी पीओपीपासून! कोणतीही साधन सामुग्री असली तरी मनात एकाच ध्यास असतो तो म्हणजे छत्रपती!
या किल्ल्यांसाठी लागणाऱ्या छत्रपतींच्या विविध स्वरूपातील मूर्ती, मावळे, गवळणी, तोफा, बुरुज, इतकेच नाही तर गडकोटांचे दरवाजे, हत्ती, घोडे, उंट, वाघ, सिंह, तुतारी यासारख्या अनेक वस्तू या माती आणि पीओपीपासून बनविलेल्या आणि शिवकालीन वाटाव्या इतक्या अप्रतिम वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. या सर्व वस्तूंपासून बालचमू हुबेहूब किल्ल्याची प्रतिकृती साकारतात.
यासंदर्भात ‘बेळगाव लाईव्ह’ ने दिवाळी निमित्ताने बाजारात फेरफटका मारला. यादरम्यान बेळगावमधील या मूर्तींच्या अत्यंत जुन्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला. मारुती गल्ली येथे तीन पिढ्यांपासून सुरु असलेला हा मारुती व्यवसाय अजूनही सुरु आहे. परंतु हा व्यवसाय केवळ व्यवसाय म्हणून नाही तर आजच्या पिढीला छत्रपतींबद्दलचा इतिहास समजावा आणि त्याची गोडी लागावी म्हणून केलेला हा प्रयत्न असल्याचे मारुती गल्ली येथील व्यापारी अमोल पुजारी यांनी सांगितले. प्रत्येक वर्षी आम्ही या मूर्ती कोल्हापूर आणि पुण्याहून बेळगावमध्ये आणतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे म्हणावा इतका प्रतिसाद नाही. परंतु तरीही आकर्षक अशा मुर्त्या बाजारात उपलब्ध असल्याचे त्यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ ला सांगितले.
बेळगावमध्ये शहर आणि तालुका मर्यादित अनेक संस्था या किल्ल्यांच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करतात. परंतु केवळ या स्पर्धेत सहभाग दर्शविण्यासाठी नाही तर अत्यंत हिरीरीने आणि उत्साहाने हे किल्ले साकारताना बालचमू दिसतात. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. संपूर्ण शहर परिसरात झगमगाट होईल. यासोबतच बालचमूंनी केलेल्या या किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहण्याचीही पर्वणी आपल्याला मिळणार, हे विशेष! साडेतीन शतकांहून अधिक काळ लोटला तरीही छत्रपतींविषयी असलेला आदर आणि उत्साह पाहून अंगावर शहारे आले नाही तरच नवल!