शाळा सुरू कराव्यात की नाही? याबाबत बेळगांवच्या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये उद्या शुक्रवार दि. 6 नोव्हेंबर रोजी महत्वाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षातील नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून शुक्रवारी होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. राज्यातील शाळा सुरू करायच्या की नाही? यासंदर्भात राज्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार आहे.
या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यभरातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी उद्या शुक्रवारी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत संपर्क साधला जाणार आहे. या कालावधीमधील दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंतची वेळ बेळगांव आणि गुलबर्गा विभागासाठी राखून ठेवण्यात आली आहे.
राज्यातील शाळा पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात सदर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता असल्यामुळे शालेय शिक्षण क्षेत्रातील सार्यांचे लक्ष या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगकडे लागून राहिले आहे.