१ नोव्हेंबर रोजी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत वक्तव्य केले होते. याबाबतीत अजूनही आमदार अरविंद पाटील यांच्याकडून कोणताच दुजोरा मिळाला नाही परंतु रमेश जारकीहोळीच्या विधानाला केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
राज्याची जमीन, पाणी आणि भाषेविरोधात लढा देणाऱ्या लोकप्रतिनिधींना भाजपमध्ये प्रवेश देण्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. घटप्रभा येथे सेवादलाच्या कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते.
भाजपचे पक्ष सिद्धांत हे अशा प्रकारे आहेत, तर याबद्दल मी काय बोलणार? राज्याच्या विरोधात कार्य करणाऱ्यांना पक्ष प्रवेशासाठी दरवाजे उघडे करण्यात येतात. पक्षाला आव्हान देणाऱ्याना पक्षात घेण्यापूर्वी दहावेळा विचार करायला हवा होता. परंतु रमेश जारकीहोळींनी मात्र माजी आमदारांना पक्षात घेण्याचे वक्तव्य केले. हे त्यांच्या पक्षाचे विचार असू शकतात त्यावर मी काय बोलणार? अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
१ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा केला जातो. तर दुसऱ्या बाजूला सीमाभागातील समस्त मराठी जनतेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात काळा दिन पाळला जातो. सीमाभागातील जनतेचा लढा हा कोणत्याही भाषेविरोधातील, किंवा राज्यविरोधात नसून तो केंद्र सरकारच्या भाषावार प्रांतरचनेच्या विरोधात आहे. लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या मराठी जनतेला कर्नाटक सरकार वेळच्यावेळी दडपशाहीखाली वागवतो.
लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या मराठी भाषिकांचा लढा हा संपूर्ण कर्नाटकाविरोधात नाही तर मराठी जनतेला देण्यात येणाऱ्या वागणुकीविरोधात आणि कर्नाटकी अत्याचाराच्या विरोधात आहे. परंतु मराठी भाषिकांना दुजाभाव देऊन केवळ राजकारणाचा विषय म्हणून चघळणाऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना याची जाणीव नाही. माजी आमदार अरविंद पाटील हे भाजप प्रवेश करतील किंवा न करतील.. परंतु सीमालढ्याचे गांभीर्य नसणाऱ्या आणि या लढ्याबद्दल माहिती नसणाऱ्या अनेक राजकारण्यांनी केवळ राजकारण म्हणून हा विषय पुढे करून चघळण्याचा प्रकार चालविला आहे.