भाजप सरकार सुरुवातीपासूनच विकासाकडे दुर्लक्ष करत आले आहे. आणि आताही तेच करत आहे. केवळ पक्ष संघटना आणि बळकटीसाठी गुंतलेल्या भाजपाने विकासाकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केला आहे. गोकाकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी असा आरोप केला आहे.
रविवारी गोकाक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, कि पक्ष संघटन करणे हे भाजपासाठी नवे नाही. सुरुवातीपासूनच या पक्षाने या पक्षातील कार्यकर्ते, नेते आपल्या पक्षात सामावून घेतले आहेत. केवळ आणि केवळ याच उपक्रमात भाजप गुंतलेले आहे. परंतु ज्या ज्याठिकाणी भाजपचे सरकार आहे त्या त्या ठिकाणी विकास मात्र शून्य असल्याचा आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केला आहे. प्रत्येक वर्षी बेळगावमध्ये स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येतो. परंतु बेळगावमधील समशानभूमीत होणारा कार्यक्रम यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकाक येथे आयोजित करण्यात आला आहे. आज गोकाक येथील स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
आज बेळगावमधील तालुका भागातील काही नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस पक्षाला राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील झाले आहेत. यामध्ये डीसीसी बँकेवर संचालक पदी निवडून आलेल्या काँग्रेस समर्थकांचाही समावेश आहे.
या कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात काँग्रेसला धक्का पोहोचला असल्याची चर्चा बेळगावमध्ये रंगत असतानाच आज गोकाक येथील कार्यक्रमात भाजपच्या या नेहमीच्या सवयीवर काँग्रेसने जोरदार टीका केली असून भाजपचे विकासाकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.