बेळगांव लोकसभा पोटनिवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी काँग्रेसच्या तिकिटासाठी अनेक इच्छुक उमेदवारांची नांवे पुढे येऊ लागली आहेत. एकीकडे काँग्रेसकडून कालच माजी मंत्री एम. बी. पाटील व सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली सात-आठ जणांच्या नावांबाबत पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी विचारविनिमय झाला असताना आता खुद्द केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नांवाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच सतीश जारकीहोळी यांनी बेळगांव लोकसभा पोटनिवडणूक लढवावी, अशी सूचना बहुदा काँग्रेस हायकमांडकडून येण्याची शक्यता आहे.
बेळगांव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी केवळ सतीश जारकीहोळीच नव्हे तर माजी खासदार अनिल लाड आणि खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांच्या नांवाची देखील चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसकडून या दोन मराठी नेत्यांची नांवे पुढे आली असली तरी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनाच तिकिट मिळण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून कळते.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि माजी आमदार फिरोज सेठ या दोघांनी सतीश जारकीहोळी यांच्या नावाची हायकमांडकडे शिफारस केली असल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. विशेष म्हणजे सतीश जारकीहोळी हे आतापर्यंत एकाही निवडणुकीत पराभूत झालेले नाहीत. तसेच बेळगांव भागात विशेषता मराठी जनतेमध्ये त्यांचे भरपूर समर्थक आहेत. याचा फायदा घेऊन तसेच इतर कन्नड भागातील मते आकर्षित करण्यासाठी सतीश जारकीहोळी यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.