कोरोना महामारीमुळे अनेक सण-उत्सवांवर विरजण पडले होते. मात्र आता परिस्थिती आटोक्यात येत असताना दिवाळीच्या शुभमुहूर्तावर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. अवघ्या कांही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले आहेत.
बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. दिवाळीपूर्वीच कपडे, फराळाचे साहित्य तसेच इतर वस्तू घेण्यावर नागरिकांनी भर दिला आहे. अनलॉक -5 मध्ये प्रशासनाने कांही शिथिलता आणल्यामुळे नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी पहावयास मिळत आहे. यापूर्वी कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक जण घराबाहेर पडण्यास धजत नव्हते. मात्र आता नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडताना दिसत आहेत. बाजारपेठेत गर्दी होत असल्याने नियमांचे पालन करण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे.
देशातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. त्यामुळे या सणानिमित्त खरेदीला उधाण आल्याचे दिसून येत आहे. बाजारातील गर्दी पाहता नागरिकांना कोरोनाचे भय राहिलेले नाही असे दिसून येते. बाजारपेठेसह शॉपिंग मॉल्स, दुकानांमध्येही गर्दी होताना दिसत आहे. बहुतांश ठिकाणी मास्क इतर नियमांचे पालन करण्यात येत आहे, तर काही ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, काकतीवेस आदी ठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. घरगुती साहित्यासह वाहन खरेदीसाठीही नागरिक सज्ज झाले आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आपले आवडते वाहन घेण्यासाठी शोरूममध्ये बुकिंग होत असतानाचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाते भय जरी असले तरी यंदाची दिवाळी दरवर्षी पूर्वीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरी होईल, अशी अपेक्षा आहे.