सर्वांना विश्वासात घेऊन कार्यरत राहण्याबरोबरच आगामी 5 वर्षात डीसीसी बँकेचे खेळते भांडवल 10 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा आणि बँक सातत्याने नफ्यात राहील यासाठी आपला प्रयत्न असणार असल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (डीसीसी) नूतन अध्यक्ष रमेश कत्ती यांनी सांगितले.
डीसीसी बँकेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड आज सकाळी जाहीर करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नूतन अध्यक्ष रमेश कत्ती यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून पाचव्यांदा मला डीसीसी बँकेचा अध्यक्ष होण्याची संधी दिली आहे. यासाठी प्रथम मी त्या सर्वांचा आभारी आहे. दोन दशकांपूर्वी 1 एप्रिल 1999 साली मी पहिल्यांदा डीसीसी बँकेचा अध्यक्ष झालो होतो. त्यावेळी बँकेचे खेळते भांडवल 577 कोटी रुपये इतके होते. परंतु सध्या एकूण खेळते भांडवल 5,131 कोटी रुपये इतके आहे. हे खेळते भांडवल पुढील 5 वर्षात 10 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे माझे ध्येय आहे. त्याचप्रमाणे बँक 100 टक्के नफ्यामध्ये राहील यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
बँकेच्या संचालक मंडळासह अधिकारी आणि कर्मचारी अशा सर्वांना विश्वासात घेऊन मी बँक चालविणार आहे. तसेच जिल्ह्यातील गोरगरीब शेतकरी आणि स्व -सहाय्य संघांना केंद्र आणि राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यावर माझा भर असणार आहे, असेही रमेश कत्ती यांनी स्पष्ट केले.
तुम्हाला पाचव्यांदा डीसीसी बँकेचे अध्यक्षपद मिळाले आहे याचे श्रेय तुम्ही कोणाला देता? या प्रश्नाला उत्तर देताना एखाद्याला तुला आई पाहिजे की वडील पाहिजेत असे विचारले तर तो काय उत्तर देणार? तशी माझी स्थिती आहे. तथापि सहकार क्षेत्रात सर्वांना विश्वासात घेऊन निवड केली जाते. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष, संघ -संस्था आणि नेतेमंडळींनी एक मताने मला निवडून दिलेले आहे. सर्व नेत्यांनी चर्चेअंती आमच्यावर बँकेची बाबदारी टाकली आहे, असेही नूतन अध्यक्ष रमेश कत्ती यांनी सांगितले.