दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाचे संघटना कार्यदर्शी बी. एल. संतोष यांची बेळगावचे जिल्हा पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी शुक्रवारी भेट घेतली. बी. एल. संतोष यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या दिल्ली भेटीआधी जिल्हा पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी शुक्रवारी भाजप हायकमांडची भेट घेतली. यावेळी युती सरकारच्या धोरणाविषयी चर्चा करण्यात आली असून भाजपमधील अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची माहिती रमेश जारकीहोळी यांनी दिली. यासाठी अनेक जण प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बी. एल. संतोष यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कि मुख्यमंत्री येडियुरप्पा हे दिल्लीला येणार होते याची मला माहिती नव्हती. मी आल्यानंतर लगेचच मुख्यमंती दिल्लीला आले आहेत.
आपण केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. यावेळी राज्याच्या जल योजनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. परंतु बंगळूरला लवकर परतल्यामुळे दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही, अशी माहिती पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.