केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार, शेतकरी धोरणाचा विरोध तसेच अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हा अंगणवाडी कार्यकर्त्यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले. अंगणवाडी कार्यकर्त्यांना सेवा हमी, विविध सुविधा मिळाव्यात, अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या सेवा सरकारी शाळांना जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे, याला विरोध दर्शवत, तसेच कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात राबविण्यात येणाऱ्या धोरणांचा विरोध करत अंगणवाडी कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन छेडले.
सरकारने अंगणवाडी कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सेवा सुरक्षा मिळवून द्यावी, कोरोनाकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सेवा बजाविली आहे. त्यामुळे अंगणवाडी कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी हे आंदोलन करत असल्याची माहिती अंगणवाडी प्रमुखांकडून देण्यात आली.
त्याचप्रमाणे राज्य आणि केंद्र शासनाने कामगारांच्या विरोधात अनेक धोरणांचा अवलंब केला आहे. सध्याच्या आर्थिक टंचाईच्या काळात प्रत्येक कामगाराला आपले दैनंदिन आयुष्य जगणे कठीण झाले आहे. अशातच रोज नवनवी धोरणे अंमलात आणली जात आहेत. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या बाबतीतही अशीच धोरणे अवलंबिली जात आहेत. वातावरणाचा भरवसा नसल्याने कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यासह अनेक संकटांना शेतकऱ्याला सामोरे जावे लागते. परंतु शेतकऱ्याचा विचार न करता शेतकऱयांच्या विरोधातील धोरण सरकार अवलंबत असून याचा आपण जाहीर निषेध करत असल्याचेही यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
सरकारने या बाबींकडे त्वरित लक्ष देऊन या समस्या सोडवाव्यात यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सीआयटीयूचे खजिनदार जी. व्ही. कुलकर्णी, एल. एस. नायक, अंगणवाडी नोकर संघाच्या जिल्हा अध्यक्षा दोड्डव्वा पुजारी, मंदा नेवगी, भारती जोगणणवर यांच्यासह शेकडो अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.