बेळगांव शहरात स्मार्ट सिटीचे काम सुरू होऊन 4 वर्षे उलटली तरी ही योजना पूर्णत्वास नेण्यास जिल्हा प्रशासन आणि बेळगाव स्मार्ट सिटी लि.ला अद्याप यश आलेले दिसत नाही. मात्र संथ गतीने सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे नागरिकांचा मनस्ताप वाढला असून संबंधित विकास कामे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.
सध्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात सर्वत्र विविध विकास कामे सुरू आहेत. तथापि संथगतीने सुरू असलेल्या या विकास कामांमुळे शहराला भकास स्वरूप प्राप्त झाले असून याबद्दल सार्वत्रिक टीका होत आहे. स्मार्ट सिटीच्या कासवगतीने सुरू असलेल्या आणि बऱ्याच ठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेल्या विकासकामांमुळे आतापर्यंत 3 जणांचा बळी गेला आहे.
आज शनिवारी दुपारी भाग्यनगर येथे एका 18 वर्षे विद्यार्थ्याचा जो बळी गेला त्याला स्मार्ट सिटी योजनाच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून ही योजना आणखी किती जणांचा बळी घेणार? असा संतप्त सवाल केला जात आहे.
यापूर्वी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या मंडोळी रस्त्यावर एका वृद्धाचा बळी गेला होता, त्यानंतर एपीएमसी रोड येथे आणखी एकाचा बळी गेला होता. आता भाग्यनगर येथे विद्यार्थ्यांचा जो अपघाती मृत्यू झाला तो स्मार्ट सिटी योजनेचाच बळी असल्याचे बोलले जात आहे. कारण गेल्या कांही महिन्यापासून अनगोळ येथील मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे परिवहन मंडळाच्या बसेस भाग्यनगरमार्गे वळविण्यात आल्या आहेत.
अनगोळ रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून तो वाहतुकीस खुला केला असता तर आज एका निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेला नसता, अशा प्रतिक्रिया भाग्यनगर येथील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. गेल्या 4 महिन्यांपासून अनगोळ येथील रस्त्याचे विकास काम सुरू आहे. रखडत सुरू असलेल्या या कामाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले होते. परंतु स्मार्ट सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे डोळे अद्यापही उघडलेले नाहीत.