लोकसभा निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. परंतु त्यापूर्वीच अनेक दिग्गजांच्या निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. परंतु केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी मात्र या निवडणुकीत आपल्याला रस नाही असे जाहीर केले आहे. आज बेळगावमध्ये काँग्रेसभवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले कि, बेळगावच्या विकासाच्या दृष्टीने बेळगावचे विभाजन होणे आवश्यक आहे. गोकाक, चिकोडी यांची गणती जिल्ह्यामध्ये करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. धारवाडमध्ये सुरुवातीला १८ विधानसभा क्षेत्रे होती. आम्ही सुरुवातीपासूनच विकासाच्या दृष्टिकोनातून बेळगावच्या विभाजनाची मागणी करत होतो. परंतु अजूनपर्यंत याची पूर्तता करण्यात आली नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार निवडीबाबत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतरच उमेदवार घोषित केला जाईल. असे ते म्हणाले. या लोकसभा निवडणुकीसाठी माझे नाव चर्चेत आहे, असे माझ्या कानावर आले आहे. परंतु मला वैयक्तिक रित्या या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे स्वारस्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावे पुढे आली आहेत.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. काँग्रेसमध्ये उमेदवारांची कमतरता नाही. परंतु लोकसभेसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मस्की येथे होणाऱ्या निवडणुकीसाठी आमचा उमेदवार निश्चित झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्नाटक बंद संदर्भात बोलताना ते म्हणाले की, या बंदीसाठी काँग्रेसचा पाठिंबा नाही. तसेच समुदाय आणि महानगरपालिका संचालक मंडळालाही आमचा विरोध नाही. परंतु हि गोष्ट बजेटवेळी घोषित करावी, असे ते म्हणाले. या बैठकीला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, नगराध्यक्ष राजू सेठ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.