मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्नाटक सरकारने नुकतीच मराठा विकास प्राधिकरण महामंडळाची घोषणा केली असून या प्राधिकरणाची ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर केलेल्या या घोषणेबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यासाठी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार अनिल बेनके उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, मराठा समाजाच्या विकासाच्या दृष्टीने या राज्य पातळीवरील प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मराठा विकास प्राधिकरण स्थापण्याची घोषणा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सरकारने राज्य पातळीवर हे प्राधिकरण निर्माण करण्याचे आदेश दिले असून यासाठी ५० कोटी रुपयांची घोषणा केली आहे.
मराठा समाजाचा सर्वांगीण विकास आणि मराठा समाजाच्या हिताचा उद्देश साध्य करण्यासाठी सर्वानी या महामंडळाचा उपयोग करून घ्यायचा आहे. संपूर्ण मराठा समाजाला एकत्रित आणण्यासाठी महामंडळाची स्थापना करण्यात येत असून राज्यस्तरीय महामंडळात बेळगाव जिल्ह्यातील अधिकाधिक सभासदांना सहभागी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात अधिकाधिक मराठा समाज असल्यामुळे बंगळूरमध्ये सातत्याने फेऱ्या मारण्यायाऐवजी या राज्यस्तरीय महामंडळाचे कार्यालयही बेळगावमध्ये सुरु करण्याची मागणी करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त सध्या ३ए या श्रेणीत मोडणाऱ्या मराठा समाजाला २ए श्रेणीत समाविष्ट करून घेण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगावमधील मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ऍडव्होकेट के. एस. येळ्ळूरकर यांच्या प्रयत्नातून क्षत्रिय मराठा परिषद बेळगावमध्ये सुरु करण्यात आली होती. सातत्याने मराठा समाजाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या होत्या. त्यातील एक प्राधिकरण स्थापनेची मागणी होती. येत्या काळात
प्राधिकरणाच्या माध्यमातून मराठा समाजाला उपयुक्त अशा गोष्टी केल्या जातील, तसेच मराठा समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संपूर्ण समाजाने याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा, असे मत अनिल बेनके यांनी व्यक्त केले.