बेळगांव कायदा आणि सुव्यवस्था पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पोलिसांच्या रात्रीच्या सर्व गस्ती पथकांसह अधिकाऱ्यांकडून दररोज मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत शहरात वावरणारी वाहने आणि व्यक्तींचे तपासणी मोहीम हाती घेण्यात येत आहे.
बेळगांव शहर परिसरात अलीकडच्या काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यात भर म्हणून गेल्या कांही दिवसांपासून शहर व उपनगरांमध्ये कार चोरीच्या घटना वाढल्या आहेत. खास करून इनोव्हा कार चोरण्यात येत आहेत. यासाठी एक हायटेक टोळीच कार्यरत असून केवळ आठवडाभरात तीन कार चोरण्यात आल्या आहेत.
घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या इनोव्हा कार चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवबसवनगर व माळमारुती परिसरातून दोन इनोव्हा व येडीयुराप्पा मार्गावर उभी करण्यात आलेली एक ऑडी अशा तीन महागड्या कारगाड्या केवळ आठवड्याभरात चोरण्यात आल्या आहेत.
बेळगाःव पोलीस चोरट्यांच्या या हायटेक चोरीच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नात आहे. त्या अनुषंगाने शहर -उपनगर परिसरात आता दररोज रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत पोलिसांची रात्रीची सर्व गस्ती पथके डोळ्यात तेल घालून कार्यरत राहणार आहेत.
या कालावधीत रस्त्यावर वावरणाऱ्या वाहनांसह नागरिकांची चौकशी व तपासणी केली जाणार आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या या मोहिमेमध्ये रात्रीच्या गस्तीवरील पोलिस कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिकारी तसेच शक्ती आणि रक्षक ही पथके सहभागी असणार आहेत. याची समस्त नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.