बेळगाव हे कलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. साहित्य आणि कलासंस्कृतीचा वारसा लाभलेल्या आपल्या शहरात अनेक कलाप्रेमी, कलाकार आहेत. कलेच्या सेवेत असणाऱ्या आणि अनेक वर्षे बेळगावची साहित्य, कलासंस्कृती जपणाऱ्यांमध्ये विठ्ठल याळगी, प्रा. संध्या देशपांडे, प्रा. अरुण नाईक, आशा रतन, प्रभाकर शहापूरकर, माधव कुंटे, निता कुलकर्णी, अनिरुद्ध ठुसे यांच्यासारख्या अनेक नाट्यकलाकारांनी आजपर्यंत बेळगावमध्ये नाट्यपरंपरा जपली आहे. आज ५ नोव्हेंबर… मराठी रंगभूमीदिनाच्या निमित्ताने बेळगावमधील नाट्य कलाकार अरुणा नाईक यांच्याशी ‘बेळगाव लाईव्ह’ ने साधलेला संवाद.
धारवाडमधून शालेय जीवनापासून नाटक कलेची आवड असणाऱ्या प्रा. अरुणा नाईक यांनी बेळगावमध्ये प्रा. संध्या देशपांडे यांच्या सहकार्यातून पुन्हा रंगभूमीवर प्रवेश केला. जीएसएस महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा. अरुणा नाईक यांचं रंगभूमीशी घट्ट नातं आहे. ‘बेळगाव लाईव्ह’शी संवाद साधताना त्या म्हणाल्या कि, मागील कित्येक वर्षांपासून मनोरंजन आणि प्रबोधन यांची सांगड घालत नाट्यसंस्कृतीचा वारसा मनोरंजन विश्वात जपला जात आहे. आज अनेक मनोरंजनाची साधने आली.
परंतु नाट्यपरंपरा आजही तशीच जिवंत आहे. शालेय जीवनापासून नाटक क्षेत्रात सहभाग घेत महाविद्यालयीन आयुष्यातही अनेकवेळा रंगमंचावर काम करण्याची संधी मिळाली. ‘नाट्यांकुर’ या संस्थेच्या माध्यमातून अनेक बालनाट्य केली. तेंडुलकर महोत्सवात सहभाग घेतला. बेळगावमध्ये अनेक हौशी कलाकार आहेत तसेच हौशी प्रेक्षकही आहेत. करवाढीमुळे आज बेळगावमध्ये नाटक येणे खूप कमी झाले आहे. परंतु तरीही स्थानिक पातळीवरील कलाकार आपापल्या परीने आजही बेळगावमध्ये नाट्यपरंपरा जपत आहेत. आज जरी नाटकांचे स्वरूप, विषय आणि रंगमंच बदलले असले तरीही नाटकाची परंपरा आजही जिवंत आहे आणि ती तशीच यापुढेही जिवंत राहील, असा आपल्याला ठाम विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या.
बेळगावमध्ये ही नाट्यपरंपरा ‘कॅपिटल वन’ या सहकारी संस्थेच्या वतीनेही अनोख्या पद्धतीने जपली जाते. प्रत्येक वर्षी भव्य आंतरराज्य एकांकिका स्पर्धा आयोजिण्यात येतात. या एकांकिकांमधून अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. शिवाय या व्यासपीठावर सादर करण्यात आलेली नाटकं लोकप्रिय ठरतात. नवनवे विषय हाताळले जातात. नाट्य संस्कृतीचा वारसा जपत आणि नाट्यसंस्कृतीचे पुनरुज्जीवन या संस्थेने या उपक्रमाच्या माध्यमातून सुरु ठेवले आहे.
अलीकडच्या काळात रंगभूमीवर सामाजिक, मनोरंजनपर, पौराणिक, ऐतिहासिक, रहस्यमय असे वेगवेगळे विषय हाताळले जाऊ लागले आहेत. अनेक नवीन मराठी नाटके तसेच जुन्या नाटकाचे रिमेकही गाजत आहेत. तब्बल 170 वर्षाची ही मराठी नाटकाची परंपरा येत्या काळातही अधिक वृद्धिंगत होत राहो, ही सदिच्छा आणि सर्व रंगकर्मींना मराठी रंगभूमी दिनाच्या ‘टीम बेळगाव लाईव्ह’ कडून शुभेच्छा!