Sunday, May 5, 2024

/

कामगार संघटनांच्या आंदोलनाने दणाणून गेले जिल्हाधिकारी कार्यालय आवार

 belgaum

वाढती महागाई कामगार व शेतकरी विरोधी कायदे आणि खाजगीकरणाच्या विरोधात बेळगांवातील विविध केंद्रीय कामगार संघटनांनी आज संप पुकारून जोरदार निदर्शने केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवार कांही काळ दणाणून गेले होते.

वाढती महागाई कामगार व शेतकऱ्यांच्या विरोधात होत असलेले कायदे शिक्षण क्षेत्रामधील विद्यार्थ्यांच्या विरोधातील नवे शैक्षणिक धोरण देशभरात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार आदी सर्व गोष्टींच्या निषेधार्थ बेळगांवातील विविध 10 केंद्रीय कामगार संघटनांनी आज गुरुवारी संप पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी कामगार नेते ॲड. नागेश सातेरी आणि ॲड. राम आपटे यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनांचे विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन निवेदनाचा स्वीकार केला. त्याचप्रमाणे कामगार संघटनांच्या मागण्यांसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

 belgaum

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना कामगार नेते ॲड. नागेश सातेरी म्हणाले की, वाढती महागाई कामगार व शेतकऱ्यांच्या विरोधात होत असलेले कायदे, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये नवे धोरण आणून विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय, देशभरातील महिलावर महिलांवर होत असलेला अन्याय, विविध क्षेत्रांचे खाजगीकरण, पेट्रोल व डिझेल यांची सतत होणारी दरवाढ आदी सर्व गोष्टींच्या निषेधार्थ बेळगांवातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी संप पुकारला आहे.Labour dept

हजारो कामगारांनी बलिदान करून मिळालेले कामगार कायदे मोदी सरकार एका झटक्यात नष्ट करू पाहत आहे. दररोज 8 तास काम मिळावे म्हणून हजारो कामगारांनी आपले बलिदान दिले आहे. मात्र आता 12 तासाचे काम करण्याचा विचार सुरू आहे. खाजगीकरण झपाट्याने होत आहे. देशातील बँका, एलआयसी, बंदरं, विमानतळं, रेल्वे हे सर्व खाजगी करण्याच्या मार्गावर असून त्याला आमचा विरोध आहे. त्याचप्रमाणे गेली 45 वर्ष सातत्याने मागणी करून देखील अंगणवाडी महिलांना नोकरीत कायम करण्यात आलेले नाही. त्यांचा पगार वाढवण्यात आलेला नाही. एकंदर देशात कोणताही विभाग समाधानाने रहात नाही याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे, असे ॲड. नागेश सातेरी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालया समोरील आंदोलनामध्ये ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, कर्नाटक विकास ग्रामीण बँक स्टाफ असोसिएशन, कर्नाटक विकास ग्रामीण बँक ऑफिसर्स वक्कुट, अंगणवाडी कर्मचारी संघटना, कर्नाटक राज्य परिवहन कर्मचारी संघटना आदी विविध संघटनांचा सहभाग होता. आपल्या विविध मागण्यांसाठी या संघटनांचे कार्यकर्ते करत असलेल्या घोषणांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवार दणाणून गेले होते.

त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विविध कामगार संघटनांच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या गर्दीमुळे आवार फुलून गेले होते. कांही संघटनांकडून जोरदार निदर्शने केली जात होती तर कांही संघटनांच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. कामगार संघटनांच्या या आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.