सीमाभागातील समस्त मराठी जनतेच्या वतीने पाळण्यात येणारा काळा दिन नेहमीच ‘करनाटकी’ करवेला झोंबतो. लोकशाही आणि नियमांचे शहाणपण शिकविणारे करवेचे तथाकथित कार्यकर्ते सातत्याने मराठी भाषिकांच्या विरोधात आग ओकत असतात.
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूकमोर्चा आणि सायकल फेरीला परवानगी नसल्यामुळे मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते याठिकाणी गोगटे सर्कल उड्डाण पुलावरून करवेच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला.
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने नियम आणि अटींची मार्गसूची जारी केली आहे. या नियमाच्या चौकटीत महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठा मंदिर येथे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध नोंदविण्यासाठी आंदोलन उभे केले आहे. या धरणे आंदोलनात केवळ लोकशाहीच्या मार्गाने आणि कोणत्याही नियमांची पायमल्ली न करता प्रशासनाच्या मार्गसूचीनुसार आंदोलन सुरु ठेवले आहे. परंतु यादरम्यान करवेने मात्र पोलिसांच्याच नाकी नऊ आणली. आंदोलनस्थळी कूच करणाऱ्या करवेने पोलिसांना न जुमानता पुन्हा पुन्हा आंदोलनस्थळी जाऊन आंदोलन बंद पाडण्याचे प्रयत्न केले.
सातत्याने प्रसिद्धीच्या मागे धावत असणारी करवे हेतुपुरस्सर मराठी भाषिकांना टार्गेट करण्याचे काम करते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या करवेला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला.
परंतु चारीबाजूंनी जाऊन आंदोलनस्थळी पोहोचून आंदोलन थांबविण्यासाठी करवेने प्रयत्न केले. महाराष्ट्र एकीकरण समितीसह राज्यसरकार विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलिसांनी अधिक कुमक मागवून या करवेच्या कार्यकर्त्यांना रोखले.