बेळगांव आणि खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात 24 तास सुरळीत वीज पुरवठा करण्याचा निर्णय हेस्कॉमने घेतला असून यासाठी या दोन्ही तालुक्यातील नऊ गावांमध्ये 33 ते 220 के.व्ही. वीज केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे आता लवकरच या दोन्ही तालुक्यातील जनता भारनियमनातून पूर्णपणे मुक्त होणार आहे.
बेळगांव तालुक्यातील 114 आणि खानापूर तालुक्यातील 244 गावांना 24 तास वीजपुरवठा करण्याचे हेस्कॉमचे उद्दिष्ट आहे. निरंतर ज्योती वीज योजनेमुळे ग्रामीण भागात 24 तास वीजपुरवठाचे स्वप्न पूर्ण झाल्याचे चित्र बऱ्याच गावांमध्ये दिसून येत आहे. आता उर्वरित गावांमध्ये देखील 24 तास वीज पुरवठा केला जाणार आहे. त्यानुसार बेळगांव व खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यात 33 ते 220 के.व्ही. वीज केंद्रे निर्माण करण्यासाठी कांही महिन्यापूर्वी निधी मंजूर झाला आहे. त्याद्वारे बेळगांव तालुक्यात 4 आणि खानापूर तालुक्यात 5 वीज केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
सध्या बेळगांव तालुक्यातील देसुर वीज केंद्राची क्षमता सर्वाधिक 220 के.व्ही. आहे त्यानंतर हुदली, होनगा, नावगे व कोडचवाड येथील वीज केंद्राची क्षमता प्रत्येकी 110 के.व्ही. तर हिंडलगा हलशी व बैलूर येथील वीज केंद्रांची क्षमता प्रत्येकी 33 के.व्ही. इतकी आहे.
दरम्यान, बेळगांव तालुक्यातील 114 गावांमध्ये निरंतर ज्योती योजना राबविण्यात आल्यामुळे या गावांमधील भारनियमन पूर्णपणे बंद झाले आहे. त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील 244 गावांना या योजनेचा लाभ झाला आहे. खानापुरातील अनेक गावे दुर्गम भागात असून देखील 244 पैकी 90 टक्क्याहून अधिक गावांना 24 तास वीज पुरवठा होत आहे. निरंतर ज्योती योजनेमुळे हेस्कॉमच्या महसुलात तर वाढ झालीच आहे शिवाय अनेक वर्षे भारनियमनाने त्रस्त झालेल्या जनतेलाही दिलासा मिळाला आहे.