कर्नाटक – महाराष्ट्र सीमावादावरील महाजन अहवालाने दिलेला निर्णय हा अंतिम असल्याचे सांगत मराठा विकास प्राधिकरणाला होत असलेला विरोध हा बंद करावा, असे आवाहन कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघाचे राज्य अध्यक्ष व्ही . एस. शामसुंदर गायकवाड यांनी केले आहे. कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघच्यावतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते.
कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या घोषणेनंतर राजकीय रंग देऊन समाजातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न काही संघटनांकडून करण्यात येत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. राज्यात जन्मलेल्या प्रत्येकाचा येथील प्रत्येक गोष्टीवर हक्क आहे. राज्याचा नागरिक या दृष्टीने प्रत्येक गोष्टीचा अधिकार हा मिळायलाच हवा.
मराठा विकास प्राधिकरणाची घोषणा झाल्यानंतर मराठी भाषिकांच्या विरोधात अनेक कन्नड संघटनांनी विरोध दर्शविण्यास सुरूवात केली परंतु हे प्राधिकरण कोणत्याही एका भाषेसाठी स्थापण्यात येत नसून मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि एकंदर सर्वांगीण विकासासाठी या प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे.
मराठा समाज देशातील मोठ्या समाजापैकी चौथ्या क्रमांकावर आहे तर कर्नाटाकात सहाव्या क्रमांकावर आहे. चामराजनगर पासून बिदरपर्यंत, पूर्व बळ्ळारीपासून उत्तर कन्नडमधील गोकर्णपर्यंत सुमारे ५० लाखांहून अधिक जनता ही मराठा समाजाशी निगडीत आहे. मुख्यमंत्र्यांनी बी. एस. येडियुरप्पा यांनी मराठा विकास प्राधिकरण हे कोणत्याही भाषेसाठी जाहीर केले नसून ते एका समाजाच्या हिताच्या दृष्टीने जाहीर केले आहे. परंतु राजकीय स्वार्थासाठी याचा उहापोह करून समाजात अशांतता माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
बेळगावमधील मराठा रेजिमेंट सेंटर हे देशातील एका मोठया रेजिमेंटपैकी आणि महत्वाच्या रेजिमेंट पैकी एक आहे. याचा अभिमान प्रत्येक कर्नाटकातील नागरिकाला असायला हवा. कर्नाटकातील अनेक देवस्थानं, मंदिरे ही केवळ मराठा समाजाच्या योध्यांमुळे आज अबाधित आहेत. अनेक मंदिरांची स्थापना ही मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहेत, याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. साहित्य क्षेत्र, चित्रपट क्षेत्रासह अनेक क्षेत्रातील मोठी मंडळी ही मोठ्या प्रमाणात मराठा समाजाशी निगडीत आहेत.
त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. परंतु अनेक मान्यवर मंडळी ही मराठा समाजाशी निगडीत आहेत. केवळ विरोधाला विरोध आणि सीमाप्रश्नाचा मुद्दा समोर आणून मराठा विकास प्राधिकरणाला विरोध करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे मत शामसुंदर गायकवाड यांनी व्यक्त केले. या बैठकीला क्षत्रिय मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.