खानापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील बेकायदा वाळू उपशामध्ये खानापूरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि तहसीलदार संगनमताने सहभागी असल्याचा आमचा संशय असून या उभयतांची सखोल चौकशी करून कडक कारवाई केली जावी, अशी मागणी खानापूर रयत संघ आणि आणि मानव अधिकार समितीतर्फे करण्यात आली आहे.
खानापूर रयत संघ आणि मानवाधिकार समितीचे अध्यक्ष गंगाधर दोडमनी यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. खानापूर तालुक्यातील मलाप्रभा नदी आणि नदीशी संबंधित अन्य जलप्रवाह असणाऱ्या भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. वाळू माफिया खानापूरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि तहसीलदारांना हाताशी धरून हे बेकायदेशीर कृत्य केल जात असल्याचा आमचा संशय आहे. या कृत्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
आपल्या मागणीसंदर्भात “बेळगांव लाईव्ह”शी बोलताना रयत संघ आणि मानव अधिकार समिती खानापूरचे अध्यक्ष गंगाधर दोडमनी म्हणाले की, सध्या खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी पात्र आणि संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. तालुक्यातील बडलवाडी येथे नुकताच जवळपास 100 ट्रक वाळू उपसा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी नदीपात्रातील दहा-वीस फूट वाळू काढल्यास वनखात्याकडून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला जातो आणि मोठा दंड ठोठावला जातो.
मात्र फडलवाडी येथील प्रचंड प्रमाणात होत असलेल्या वाळू उपशाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात तक्रार करून आरोपीना पकडा आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली असता खानापूर रेंज फॉरेस्ट ऑफिसर अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, आणि त्यांचा आम्ही शोध घेत आहोत असे सांगून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. खानापूरचे तहसीलदार देखील या बाबतीत लक्ष घालण्यास तयार नाहीत.
त्यामुळे हे दोन्ही अधिकारी खानापूर तालुक्यातील बेकायदा वाळू उपशामध्ये सहभागी असल्याचा आमचा संशय आहे यासाठी या उभयतांची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली असल्याचे गंगाधर दोडमनी यांनी सांगितले. याप्रसंगी खानापूर तालुका रयत संघ आणि मानवाधिकार समितीचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.