अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्या असून दोन टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत. येत्या २२ डिसेंबर आणि २७ डिसेंबर अशा दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे.
राज्यातील एकूण ५७६२ ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होऊ घातल्या असून मतमोजणी ३० डिसेंबर रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने बंगळुरूमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर केली असून या निवडणुकीसाठी तातडीने आचारसंहिता लागू होईल.
दि.22 आणि 27 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार असून यादरम्यान कोविडसंदर्भात सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. या निवडणुकीसाठी बिदर जिल्ह्यात ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात येणार आहे तर इतर सर्व ठिकाणी बॅलेट पेपरवरच या निवडणुका होणार आहेत.
एकूण ५७६२ ग्रामपंचायतींची या निवडणुका होणार असून ३५८८४ क्षेत्रांमधील ९२१२१ जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ११३ तालुक्यातील २९३० आणि दुसऱ्या टप्प्यात ११३ तालुक्यातील २८३२ ग्रामपंचायतींची निवडणुका होणार आहेत.
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख ७ डिसेंबर आहे तर अर्ज अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ११ डिसेंबर आहे. त्यासोबतच दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी ११ डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची तारीख असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर असणार आहे.