बेळगांव रेल्वे स्थानकानजीकच्या गोगटे सर्कल येथे सैनिक स्मारक उभारण्याची माझी इच्छा आहे आणि त्याची पूर्तता मी लवकरच करेन, असा विश्वास बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी व्यक्त केला आहे.
हनुमाननगर येथे 2 कोटी 52 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या उद्यान स्विमिंग पूल आणि आउटडोर जिमची पाहणी केल्यानंतर आज मंगळवारी सकाळी “बेळगांव लाइव्ह”शी बोलताना आमदार बेनके यांनी उपरोक्त विश्वास व्यक्त केला. आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, हनुमाननगर येथे 2 कोटी 52 लाख रुपये खर्च करून सुंदर उद्यान, स्विमिंग पूल, आउटडोर जिम् आणि वॉकिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे.
जनतेच्या निरोगी आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प उभारण्यात आला असून हनुमाननगरवासियांनी या प्रकल्पाचा सदुपयोग करून घ्यावा. याठिकाणी गैरप्रकारांना थारा देऊ नये आणि यासाठी स्थानिक लोकांनी संघटना स्थापन करावी, असेही आमदार बेनके म्हणाले.
शहरात अशी उद्यान का उभारली जात नाहीत? या प्रश्नाला उत्तर देताना आमदार अनिल बेनके यांनी शहरांमध्ये अशा उद्यानांसाठी जागेची कमतरता असल्याचे स्पष्ट केले. तथापि गोगटे सर्कल येथील उद्यानाचे सैनिक स्मारकात रुपांतर करण्याची माझी इच्छा आहे. त्यादृष्टीने मी यापूर्वीच प्रयत्न सुरु केले आहेत. एमएलआयआरसीच्या यापूर्वीच्या ब्रिगेडियरनी मला या स्मारकासाठी युद्धात वापरण्यात आलेले पुणे येथील तीन रणगाडे देण्याचे आश्वासन दिले आहे. या रणगाड्यांबरोबरच एक विमान या पद्धतीने सैनिक स्मारकासाठी आवश्यक सामुग्री लवकरच उपलब्ध केली जाईल.
नियोजित सैनिक स्मारकासंदर्भात मी विद्यमान ब्रिगेडियर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती पत्र लिहिले आहे. सैनिक स्मारकाच्या उभारणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तरही दिले आहे, असे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्पष्ट केले.