शहर आणि परिसरात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या वाढत चालली असून रस्त्याचे कोपरे, आडवळणे, कुंपण आणि निर्जन ठिकाणी कचऱ्याचा ढीग वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी जनता प्रशासनाकडे बोट दाखवते तर प्रशासन जनतेकडे बोट दाखवून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देते. परंतु ना जनतेकडे कोणत्या गोष्टीचे गांभीर्य आहे, ना प्रशासनाचे योग्यवेळी पाऊल उचलण्याकडे लक्ष आहे.
शहरातील यंदे खुंट चौकात वनिता विद्यालय हायस्कुलच्या प्रवेशद्वाराजवळ नेहमीच कचऱ्याचा ढीग दिसून येतो. यासंदर्भात अनेकवेळा प्रसारमाध्यमांनी प्रकाशझोत टाकला आहे. परंतु तेवढ्यापुरती वेळ मारून नेण्यासाठी प्रशासनाकडून कचऱ्याची उचल करण्यात येते. याठिकाणी कॅंटोन्मेंट प्रशासनाच्यावतीने फलकही लावण्यात आला आहे.
परंतु स्मार्ट सिटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचे गांभीर्य आणि जागरूकता दिसून येत नाही. या परिसराजवळ असलेल्या भाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांकडूनही कचरा टाकण्यात येतो. वारंवार सूचना देण्यात येऊनही कोणत्याही प्रकारचे गांभीर्य येथे कचरा टाकणाऱ्यांमध्ये दिसून येत नाही.
प्रशासनाच्यावतीने अनेक ठिकाणी ब्लॅक झोन म्हणून घोषित करण्यात आले असून त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
शहराच्या स्वागताच्याठिकाणी आणि मध्यवर्ती ठिकाणी अशाप्रकारचे कचऱ्याचे ढीग हे शहराच्या सौन्दर्यात विघ्न आणणारे ठरत आहेत. या समस्येवर तातडीने महानगरपालिका प्रशासन आणि कॅंटोन्मेंट प्रशासनाने लक्ष देऊन हि समस्या सोडविणे गरजेचे आहे. तसेच याठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचीही गरज आहे.