राज्य सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मत्स्य खवय्यांसाठी एक अभिनव योजना राबवले असून आता खवय्यांना ऑनलाइनद्वारे घरपोच मासे उपलब्ध होणार आहेत. परिणामी खवय्यांना मासे खरेदीसाठी बाजारात जाण्याची तसदी घ्यावी लागणार नाही. सध्या ही योजना बेंगलोरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून लवकरच ती बेळगांव शहरात राबविली जाण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजनेअंतर्गत ही अभिनव योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी मोबाईल ॲप तयार करण्यात आला असून याद्वारे ग्राहकांना माशांचे प्रकार व दरही मिळणार आहेत. या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत हजारो युवकांना मत्स्योद्योग खात्यातर्फे रोजगार उपलब्ध होणार आहे.
राज्यात व जिल्ह्यात मत्स्याहार करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु मासे खाणाऱ्यांना त्याची खरेदी करण्यासाठी बाजारात धावपळ करावी लागते आणि त्यामुळे वेळही वाया जातो. तथापि आता मत्स्यपालन विभागाच्या या नव्या योजनेमुळे ग्राहकांना वेळेत व ताजे मासे घरपोच मिळणार आहेत. थोडक्यात संबंधित ॲपद्वारे घर बसल्या ऑनलाइन मासे मागून खवय्ये आपल्या जिभेचे चोचले पुरवू शकणार आहेत.
राज्यातील मत्स्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून मस्त पालक शेतकऱ्यांना मत्स्यबीज देण्यात येते. त्याचबरोबर माशांचे उत्पादन वाढविण्यासाठी मस्त्य खात्यामार्फत शेत तलावासाठी अनुदानही उपलब्ध करून दिले जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षित मासे विक्रीला प्राधान्य देण्याच्या हेतूने उपरोक्त योजना राबविण्यात येत आहे.