ज्येष्ठता आणि अनुभव लक्षात घेता माझे बंधू उमेश कत्ती यांना राज्याच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये निश्चितपणे स्थान मिळेल आणि ते मंत्री होतील, असा विश्वास बेळगांव डीसीसी बँकेचे नूतन अध्यक्ष रमेश कत्ती यांनी व्यक्त केला आहे.
बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात डीसीसी बँकेच्या नूतन अध्यक्षपदी पाचव्यांदा निवड झाल्यानंतर पत्रकारांनी उमेश कत्ती यांच्या मंत्री पदाबद्दल छेडले असता रमेश कत्ती यांनी उपरोक्त विश्वास व्यक्त केला. माझे ज्येष्ठ बंधू उमेश कत्ती हे एखाद्या हिऱ्या प्रमाणे आहेत.
विधानसभेत ते तब्बल 8 वेळा आमदार म्हणून निवडून गेले आहेत. शिवाय सरकारने आम्हाला इतके कांही दिलेले असल्यामुळे वर्ष -दोन वर्षे आम्ही त्याग करायलाच हवा. मध्यंतरी आमचे सरकार थोडे अडचणीत आले होते, त्यावेळी आमच्या पक्षात पक्षांतर केलेल्या 17 जणांना मंत्रिमंडळात प्रथम प्राधान्य द्या, असे आम्हीच सांगितले होते. त्यानुसार त्यांना मंत्रिपदे देखील मिळाली आहेत. आता राज्यातील सरकार व्यवस्थित चालले आहे. तेंव्हा आगामी काळात ज्येष्ठता आणि अनुभव लक्षात घेता उमेश कत्ती यांना निश्चितपणे मंत्रिमंडळात स्थान मिळेल आणि ते मंत्री होतील, असा माझा वैयक्तिक विश्वास आहे, असे रमेश कत्ती म्हणाले.
बेळगांव लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्यास या निवडणुकीची उमेदवारी द्यावी, अशी आमची आग्रहाची मागणी असून आम्ही तसा दबाव वरिष्ठ नेत्यांवर आणला आहे. मात्र यदाकदाचित अंगडी कुटुंबीयांनी जर नकार दिला तर निश्चितपणे माझ्या नांवाचा विचार करावा अशी विनंती मी लवकरच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहे, असेही कत्ती यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी दोन वेळा मला लोकप्रतिनिधी होण्याच्या संधीने हुलकावणी दिली आहे. गेल्या 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मला 3 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर अलीकडे राज्यसभा तिकिटाच्या शर्यतीत मी होतो परंतु मला डावलून इराण्णा कडाडी यांना तिकीट मिळाले. कडाडी यांना तिकीट मिळाले याचा मला आनंदच आहे. त्यामुळे यावेळी लोकसभा पोटनिवडणुकीच्या तिकीटासाठी मला डावलले जाऊ नये. कारण लोकप्रतिनिधी या नात्याने मला या भागाचा सर्वांगीण विकास आणि जनकल्याण साधायचे आहे, असे रमेश कत्ती म्हणाले.
उमेश कत्ती आणि रमेश जारकीहोळी हे मला वडिलां प्रमाणे आहेत नेहमीच जारकीहोळी आणि कत्ती घराण्यांची राजकीय मैत्री आहे त्यामुळे मी सर्वच जारकीहोळी बंधूंचा आदर करतो असेही ते म्हणाले.महाराष्ट्राप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात यात मैत्रीपूर्ण राजकारण सुरू झाले आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना रमेश कत्ती म्हणाले की, तसे कांहीही नाही. बेळगांव जिल्ह्यात डीसीसी बँक निवडणुकीच्या निमित्ताने सहकार क्षेत्रात मैत्रिपूर्ण राजकारणाला सुरुवात झाली आहे. परंतु राजकीय पातळीवर पक्षीय राजकारण पूर्वीप्रमाणेच असणार आहे. आम्हाला पक्षाने आखून दिलेल्या चाकोरी तसेच कार्यरत राहावे लागणार आहे.