वन टच फाऊंडेशन अर्थात एक स्पर्श मदतीचा… या जुना गुडसशेड रोड बेळगांव येथील सामाजिक संस्थेच्यावतीने विजयनगर येथील सावली वृध्दाश्रमातील वृद्ध मंडळींना हार्दिक शुभेच्छा देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
वन टच फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुष्याची संध्याकाळ पाहणाऱ्या वृद्धाश्रमातील सदस्यांच्या जीवनात कांही क्षण आनंदाचे आणावेत यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आजी -आजोबांना करंजा, लाडु, चकली, चिवडा फराळ आणि मिठाईचे वाटप तर करण्यात आलेच शिवाय सुरसुरे व हुक्के यांच्या आतषबाजीने दिवाळी साजरी करण्यात आली.
फाऊंडेशनच्या अध्यक्षांसह सदस्यांसाठी हा आनंद काही वेगळाच होता. फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील, अंकुश गावडे, सौ. सुहानी लोकम, कविता आदींसह वृध्दाश्रमाचे संस्थापक डॉ. श्री.जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.