बेळगावमधील कित्तूर चन्नम्मा सर्कलजवळील सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयाला मंगळवारी उपमुख्यमंत्री अश्वथनारायण यांनी भेट दिली. यावेळी महाविद्यालयाच्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले. कोविड पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाने केलेली प्रगती ही कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांसहित विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. कोविड पार्श्वभूमीवर १०० टक्के निकाल लागल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक वर्षी उत्तम निकाल देणाऱ्या या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीने संधी उपलब्ध होतील, विद्यार्थ्यांनी कोविड सारख्या कठीण परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
बेळगावमध्ये सातत्याने अतिवृष्टीचा धोका निर्माण होत आहे. यामुळे महाविद्यालयाच्या इमारतीला तडे गेले आहेत. या महाविद्यालायच्या इमारत नूतनीकरणाचे काम हाती घेणे आवश्यक आहे.
यासंदर्भात संबंधित विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची बाब प्राचार्य वाय. एन. दोडमनी यांनी मंत्र्यांचा निदर्शनास आणून दिली. यावर मंत्री अश्वथ नारायण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहर आमदार अनिल बेनके यांच्याशी चर्चा करून महाविद्यालयाच्या इमारत नूतनीकरणासाठी सूचना दिल्या. यावेळी महिला सरकारी पदवी महाविद्यालयालाही भेट देऊन आढावा घेण्यात आला.
यावेळी मंत्री अश्वथ नारायण यांच्यासह आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलसचिव प्रो. बसवराज पद्मशाली, आयटीआय प्राचार्य वाय. एन. दोडमनी, तसेच महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.