Wednesday, January 8, 2025

/

सहकार क्षेत्रातील गुलालाच्या उधळणीने राजकीय क्षेत्राला कलाटणी?

 belgaum

बहुचर्चित आणि साऱ्यांचेच लक्ष वेधून राहिलेली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. यापूर्वी १३ जागा बिनविरोध निवडून आणून उर्वरित ३ जागांसाठी चुरशीने निवडणूक झाली. परंतु अटीतटीच्या निकालानंतर निर्णयात्मक टप्प्यावर जाहीर झालेले निकाल हे सर्वाना अचंबित करणारे ठरले आहेत. माजी आमदार अरविंद पाटील यांनी डीसीसी बँकेवर खानापूर तालुक्यातून निवडणूक लढवून विजय जरी मिळविला असला तरी प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या असलेल्या विद्यमान आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी या लढतीत जबरदस्त लढत दिली आहे.

अंजलीताई निंबाळकर यांना सर्वपक्षीयांचा पाठिंबा होता. परंतु सहकार क्षेत्रात नवख्या असणाऱ्या आणि शेवटच्या क्षणी निवडणुकीच्या तयारीत उतरलेल्या अंजलीताईंनी २५ मतांची मजल मारली तर केवळ २ मतांच्या फरकाने माजी आमदार अरविंद पाटील यांनी विजय मिळविला. सहकार क्षेत्रात गेल्या १५ ते २० वर्षांपासून सातत्याने कार्यरत असणाऱ्या अरविंद पाटील यांच्यासाठी हा विजय निसटताच होता. अरविंद पाटील यांना भाजपकडून पाठिंबा जरी देण्यात आला असला तरी पहिल्यांदाच सहकार क्षेत्रात निवडणूक लढविणाऱ्या अंजलीताईंनी २५ मते मिळवून जोरदार लढत खेळली आहे. या बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही नव्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उभे करण्यात आले असते तर इतक्या कठीण पद्धतीने निवडणूक लढविणे शक्य नव्हते. शिवाय अरविंद पाटील यांच्या इतक्या वर्षांच्या कार्यकाळानंतर हि निवडणूक लढविणे सहज शक्य होते. परंतु अंजलीताईंनी ऐनवेळी निवडणुकीत उतरून अरविंद पाटील यांना जोमदार लढत दाखवून दिली आहे.

चौथ्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून येणाऱ्या अरविंद पाटील यांचा सहकार क्षेत्रातील संपर्क जबरदस्त आहे. अरविंद पाटील यांनी ग्रामपंचायतीनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेतूनच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली होती. अनेकवेळा त्यांनी आपल्या बोलण्यातून हे दर्शविले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतूनच राजकीय क्षेत्रात उदयाला आलेल्या अरविंद पाटील यांच्यासाठी खानापूर तालुक्यातील हा महत्वाचा पाया होता. दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, राजकारणातील जोल्ले मंडळी, जारकीहोळी बंधू, कत्ती बंधू अशा अनेक दिग्गज राजकीय मान्यवरांचा विविध क्षेत्रात कार्यभार आहे. परंतु अरविंद पाटील यांच्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि या बँकेतील त्यांचे स्थान हे राजकीय कारकिर्दीतील त्यांचा महत्वाचा कणा आहे. कदाचित जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पाया त्यांना मिळाला नसता तर आमदारकीपर्यंतही पोहोचणं त्यांना शक्य नव्हतं. याव्यतिरिक्त त्यांना समितीचाही पाठिंबा मिळाला हे विशेष.Anjali vs arvind patil

अरविंद पाटील यांनी अनेकवेळा अनेकठिकाणी बोलताना असे म्हटले आहे कि, जिल्हा मध्यवर्ती बँक हा माझा श्वास आहे. या बँकेमुळे मला मिळालेली ओळख हि मी कधीच विसरणार नाही. एकवेळ आपल्याला आमदारकी नसेल तरी चालेल परंतु जिल्हा मध्यवर्ती बँक हि माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. शिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेत अरविंद पाटील यांना मिळालेला पाठिंबा हाही तितकाच महत्वाचा आहे. दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि यांच्यासहित अनेक मातब्बर नेत्यांनी त्यांच्यासाठी दर्शविलेला पाठिंबा हा त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. जिल्ह्यातील राजकारणाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेत राष्ट्रीय पक्षांच्या अस्तित्वापेक्षा मित्रत्व आणि आजपर्यंत अरविंद पाटील यांनी केलेलं कार्य हे महत्वाचे ठरले आहे.

या सर्व बाबी जरी खऱ्या असल्या तरीही इतके सारे याआधी केलेले कार्य आणि इतक्या साऱ्या मातब्बर लोकांचा पाठिंबा असूनही अरविंद पाटील यांना सहकार क्षेत्रात नवख्या असलेल्या अंजलीताई निंबाळकर यांनी दिलेली लढत ही खूपच विचार करण्यासाठी गोष्ट आहे.

येणाऱ्या कालावधीत या विजयानंतर अरविंद पाटील यांची सहकार क्षेत्रासहित राजकीय क्षेत्रातील आगेकूच, त्यांचे निर्णय आणि आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांसोबत करावी लागणारी कसरत ही खूपच अटीतटीची असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सहकार क्षेत्रासहित राजकीय क्षेत्रातील प्रतिस्पर्धीही तितक्याच ताकदीने आमने सामने करण्याची चिन्हे दिसून येत असून पुढील वाटचालीत अरविंद पाटील कोणत्या नव्या गोष्टींसह आपली कारकीर्द गाजवतात हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.