कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही हे लक्षात घेऊन 2020 सालच्या शालेय शैक्षणिक वर्षाची सुरुवात तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन जानेवारी 2021 नंतर केली जावी, अशी मागणी सिटिझन्स कौन्सिल बेळगांवतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
सिटिझन्स कौन्सिल बेळगांवचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शनिवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
कोरोना प्रादुर्भावाचे संकट अद्यापही टळलेले नाही. कोरोना आणि लॉक डाऊनमुळे बहुतांश पालक वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. अनेकांनी आपल्या नोकऱ्याही गमावल्या आहेत. या परिस्थितीत कांही शिक्षण संस्थांनी पालकांकडे वर्षभराची शैक्षणिक फी अर्थात शुल्क एकदाच भरण्याचा तगादा लावला आहे. या प्रकाराला त्वरित आळा घातला जावा आणि पालकांकडून वर्षभरात 4 हप्त्यांमध्ये शैक्षणिक फी जमा करून घेण्याचे आदेश संबंधित शैक्षणिक संस्थांना दिले जावेत. त्याच प्रमाणे यंदा मुलांना नवे गणवेश शिवण्याची तसेच शैक्षणिक साहित्य खरेदीसह सहली, समारंभासाठी शुल्क देण्याची सक्ती केली जाऊ नये.
याव्यतिरिक्त मुलांची वेळेवर वैद्यकीय तपासणी त्यांना रोगप्रतिकारक औषधे देणे, शाळा परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण आदींची अंमलबजावणी केली जावी. यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय कृती समिती स्थापन करण्यात यावी. मुलांसाठी एक तासाचे योगा शिक्षण अनिवार्य केले जावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनासंदर्भातील “सामाजिक अंतर आणि खबरदारी” यासंदर्भातील धडे शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट केले जावेत.
एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन आणि तत्कालीन परिस्थिती पाहून जानेवारी 2020 नंतर शालेय शैक्षणिक वर्ष सुरू केले जावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी सिटीझन्स कौन्सिल बेळगांवचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्यासह सेवंतीलाल शाह, अरुण कुलकर्णी आदी उपस्थित होते.