काल संध्याकाळी नेहरू नगर येथील डी मार्ट जवळ झालेल्या बालकामगारांच्या मृत्यूचे प्रकरण कुटुंबियांना पैसे देऊन दडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बसवराज रामाप्पा सुतगट्टी या १६ वर्षीय बालकामगारचा बांधकामाच्यावेळी मृत्यू झाला होता. या प्रकरणी बांधकाम मालक, बिल्डर आणि मेस्त्रींनीं कुटुंबियांना पैशाचे आमिष दाखवून हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केल्याची बाब निदर्शनास आली आहे. शिवाय मृत मुलाचे अंत्यसंस्कारही घाईगडबडीत उरकण्यात आले आहेत.
यासंबंधी ‘बेळगाव लाईव्ह’वर बातमी प्रसारित करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत डीसीपी विक्रम आमटेंनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी बांधकाम मालक आणि बिल्डरचे दुर्लक्ष कारणीभूत असून हि दुर्घटना यांच्यामुळेच घडली असल्याचे स्पष्ट आहे.
नियमानुसार बांधकामशेजारी ३ फुटांची जागा सोडणे बंधनकारक आहे. अपुऱ्या जागेमुळे काम करताना शेजारील कंपाउंड कोसळून झालेल्या घटनेत या मुलाचा मृत्यू झाला असून नियमबाह्य बांधकाम आणि बालकामगाराला कामावर ठेवल्याप्रकरणी चौकशीचे आदेश बजावण्यात आले आहेत.
याप्रकरणी कामगार विभागाची डोळेझाक होत असल्याचे वृत्त ‘बेळगाव लाईव्ह’ वर प्रसारित करण्यात आले होते. दरम्यान कामगार विभागाने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असून याप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कामगार विभागाचे उपयुक्त वेंकटेश यांनी दिली आहे.
हे प्रकरण एपीएमसी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आले असून मृत बसवराज याच्या निवासस्थानी तसेच घटनास्थळी पीआय जावेद मुशापुरी आणि सहकाऱ्यांनी भेट देऊन पुढील तपास सुरु केला आहे.
नियमबाह्य होत असलेल्या बांधकामाला या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत तसेच या कामात सहभाग असणाऱ्या बांधकाम मालकाची आणि बिल्डरची चौकशी संपूर्ण होईपर्यंत स्थगिती दिली असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु जेसीबीच्या साहाय्याने याठिकाणी काम पुन्हा सुरु करण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.