नेहरू नगर येथील डीमार्ट जवळ बांधकाम सुरु असणाऱ्या ठिकाणी काम करणाऱ्या बाल कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली असून कामगार विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे.
बेळगाव तालुक्यातील सोनट्टी या गावातील बसवराज रामप्पा सुतगट्टी (वय १६) असे मृत बालकाचे नाव आहे. या बालकामगाराच्या मृत्यूला बांधकाम मालकाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. नियमानुसार बांधकाम करताना तीन फुटाचे अंतर सोडून बांधकाम करणे आवश्यक आहे. परंतु इमारत बांधताना कम्पाउंडला लागूनच बांधकाम केल्यामुळे या मुलाच्या अंगावर कंपाउंड कोसळले. या घटनेत या मुलाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
जिल्ह्यात हॉटेल, बांधकाम, ढाबा, फुटपाथ यासह अनेक ठिकाणी बालकामगारांची संख्या अधिक आहे. यासंबंधी जिल्हा तसेच तालुका कामगार विभागाने डोळेझाक केली आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशाचपद्धतीने बालकामगार कार्यरत असून कामगार विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी कार्यरत असणाऱ्या बालकामगारांना वेळीच रोखून बालकामगार ठेवणाऱ्या मालकांवर कारवाई करणे आवश्यक आहे.