महिलांच्या बाबतीत सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे व वर्तन केल्याप्रकरणी एका माजी लष्करी जवानांसह त्याच्या पत्नीला कॅम्प पोलिसांनी अटक केल्याची घटना रविवारी घडली.
बाळाराम रूक्मान्ना कांबळे आणि नंदा बाळाराम कांबळे (दोघे मूळचे बिजगर्णी, सध्या रा. एमईएस कॉलनी विजयनगर हिंडलगा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या पती-पत्नीची नांवे आहेत. प्लॉट नं. 45 एमईएस कॉलनी विजयनगर हिंडलगा येथील रितिका रुपेश मोरे या कॉलेज विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून कॅम्प पोलिसांनी उपरोक्त दोघांना ताब्यात घेतले आहे.
रितिका मोरे हिने दिलेल्या तक्रारीनुसार, बाळाराम कांबळे हा सेवानिवृत्त लष्करी जवान प्लॉट नं. 45 एमईएस कॉलनी येथे सपत्नीक रहावयास आल्यापासून आसपासच्या महिलांकडे पाहून अश्लील चाळे करत होता. महिला कपडे धुवत असतील त्या ठिकाणी जाऊन उभे राहणे, रात्रीच्या वेळी आसपासच्या घरातील लोकांच्या बेडरूममध्ये डोकावून पाहणे आदी अश्लील प्रकार बाळाराम करत होता. त्याचप्रमाणे जाब विचारण्यास गेलेल्यांना अर्वाच्च शिवीगाळ करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे आदी प्रकार त्यांच्याकडून केले जात होते. याप्रसंगी नंदा कांबळे हीदेखील आपल्या पतीलाच साथ द्यायची.
या सर्व प्रकाराला कंटाळून शनिवारी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रितिका रुपेश मोरे या विद्यार्थिनीच्या नेतृत्वाखाली एमईएस कॉलनीतील महिलांनी कॅम्प पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली. याप्रकरणी कॅम्प पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कांबळे दाम्पत्याची हिंडलगा कारागृहात रवानगी झाली आहे. आरोपी बाळाराम रूक्मान्ना कांबळे याच्यावर अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे कळते.