रेल्वे राज्यमंत्री खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच पोटनिवडणुकीच्या चर्चा जोर धरू लागली होती. पोटनिवडणुकांच्या तारखा अजून जाहीर झाल्या नसल्या तरी राजकीय गोटात जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. बेळगावमधील काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली असून केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे.
काँग्रेसमधील उमेदवाराची जबाबदारी ही सतीश जारकीहोळी यांच्यावर तर भाजपमधील उमेदवाराची जबाबदारी ही रमेश जारकीहोळी यांच्याकडे आहे. त्यामुळे जारकीहोळी बंधूंसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत केपीसीसी कार्याध्यक्षांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणुकीची तयारी करत आहे. उमेदवार निवड समितीचे अध्यक्ष माजी मंत्री एम. बी. पाटील यांचे नाव आश्चर्यकारकरित्या पुढे आले असून त्यांच्या विजयासाठी सतीश जारकीहोळी यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे.
तर दुसऱ्या बाजूला भाजपचे रमेश जारकीहोळी यांच्यावर लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत उमेदवारापेक्षाही जारकीहोळी बंधूंमधील रस्सीखेच पाहणे हे उत्कंठावर्धक ठरणार आहे. या दोन्ही सावकार बंधूंची पक्षनिष्ठा कशापद्धतीने जपली जाणार आहे, हे पाहणे जनतेसाठी रंजक ठरणार आहे.
गोकाकमधील पोटनिवडणुकीत सतीश जारकीहोळी आणि रमेश जारकीहोळी यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. दरम्यान सतीश जारकीहोळी यांचे कनिष्ठ बंधू लेखन जारकीहोळी यांना रमेश जारकीहोळींच्या विरोधात उभे करण्यात आले होते. आता बेळगाव पोटनिवडणुकीतही काँगेस विरुद्ध भाजप तसेच जारकीहोळी विरुद्ध जारकीहोळी असा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. येत्या निवडणुकीत जारकीहोळी बंधूंसाठी उमेदवार विजयी करण्यासाठी आव्हान उभे ठाकले आहे.