कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर यंदा कोणताही सण अथवा उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास परवानगी मिळालेली नसताना कोरोना संदर्भातील केंद्र सरकारची मार्गदर्शक सूची खुलेआम पायदळी तुडवून यावेळचा 1 नोव्हेंबर राज्योत्सव दिन साजरा करण्यात आल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचीकडे बोट दाखवून जिल्हा प्रशासन साधेपणा राखण्याचा सल्ला देत होते. बेळगांवची एतिहासिक शिवजयंती व गणेशोत्सवही साजरे करण्यास सांगितल्याने ते अत्यंत साध्या पद्धतीने साजरे झाले. परंतु काल रविवारी राज्योत्सवाच्या कार्यक्रमात मात्र कोरोना संदर्भातील मार्गदर्शक
सूची अक्षरशः खुलेआम पायदळी तुडविण्यात आली होती. राज्य उत्सवाच्या नांवाखाली दिवसभर धिंगाणा चालला असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.
रविवारी 1 नोव्हेंबर रोजी राज्योत्सव मिरवणुकीला फाटा देण्यात आला असला तरी कित्तूर चन्नम्मा चौकात प्रचंड गर्दी जमून धिंगाणा घालण्यात आला. कोरोना असल्यामुळे मोठी गर्दी जमू नये याकडे यावेळी सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले होते. घोषणाबाजी व आतषबाजी करणाऱ्या या गर्दीतील बहुतेकांच्या चेहऱ्यावर मास्क देखील नव्हते. सामाजिक अंतराच्या नियमाची तर पूर्णपणे ऐशीतैशी करण्यात आली होती.
एरवी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराची शिकवण देणाऱ्या जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही याकडे डोळेझाक केल्याचे दिसून येत होते. चन्नम्मा चौकात धिंगाणा सुरू असताना बंदोबस्त असलेले वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र परिसरात तळ ठोकून बघ्याची भूमिका घेतली होती.
रविवारी दुपारी जेंव्हा बसवर दगडफेकीचा प्रकार घडला, यावेळी मात्र पोलिसांना नाईलाजाने हस्तक्षेप करून सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान राज्योत्सवाच्या नांवाखाली कोरोना मार्गदर्शक सूची धाब्यावर बसवून प्रशासन आणि आणि पोलिसांच्या डोळ्यासमोर घालण्यात आलेल्या उपरोक्त धिंगाण्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांत तीव्र नापसंती व्यक्त होताना दिसत होती.