मूळचे बेळगांवचे असणारे श्री अर्थात श्रीनिवास ठाणेदार यांची 93 टक्के मतांसह अमेरिकेतील मिचिगन येथील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये निवड झाली आहे. अमेरिकेतील निवडणुकीच्या रणधुमाळीत या पद्धतीने एका मराठमोळ्या माणसाचा डंका अमेरिकेत वाजला आहे.
श्रीनिवास ठाणेदार हे 65 वर्षाचे असून ते शास्त्रज्ञ आणि प्रख्यात व्यावसायिक आहेत.त्यांनी 438,620 अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे.दोन वर्षांपूर्वी ठाणेदार यांनी आपले इलेक्शन कॅम्पेन सुरू केले होते. टेलिव्हिजनवर त्यांनी दिलेल्या “श्री फॉर वुई” या जाहिरातीने लोकांना आपलेसे केले होते. मिचिगनच्या तिसऱ्या जिल्ह्यातून त्यांनी 93 टक्के मते मिळवून विजय मिळवला आहे. श्रीनिवास ठाणेदार हे मूळचे बेळगांवचे असून त्यांनी अमेरिकेत जावून तेथे व्यवसायात केलेली कामगिरी देखील कौतुकास्पद आहे.
1977 साली बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स डिग्री घेणारे डॉ. श्रीनिवास ठाणेदार हे 1979 साली अमेरिकेत स्थलांतरित झाले. या ठिकाणी 1982 झाली त्यांनी पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये पीएचडी संपादन केली. मिचीगन विद्यापीठांमध्ये 1982 ते 84 पर्यंत त्यांनी पोस्ट डॉक्टरल स्कॉलर म्हणून काम केले. त्यानंतर 1984 ते 1990 या कालावधीत श्रीनिवास ठाणेदार यांनी सेंट लुईस येथील पेट्रोलाईट कॉर्पोरेशनमध्ये पॉलिमर सिंथेसिस केमिस्ट आणि प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहिले. 1990 साली त्यांनी आपण स्वतः काम करत असलेली केमिर ही कंपनी विकत घेतली. ठाणेदार यांच्या दुरदर्शी कल्पकतेमुळे जेमतेम खप असणाऱ्या या कंपनीच्या उत्पादनांचा वार्षिक खप 150,000 डॉलर इतका झाला. यशस्वी उद्योजकतेच्या आपल्या कारकिर्दीत ठाणेदारी यांनी सुमारे 400 हून अधिक लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आपल्या यशस्वी व्यावसायिक कारकीर्दीत श्रीनिवास यांनी सुमारे 8 विभिन्न उद्योग खरेदी केले आणि विकले. अडचणीत आलेले उद्योग पुन्हा भरभराटीला आणणे यात ठाणेदार यांचा हातखंडा मानला जातो.
बेळगांवातील मिरापुर गल्ली, शहापूर येथील बेताचे वार्षिक उत्पन्न असलेल्या एका सर्वसामान्य कुटुंबात डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांचा जन्म झाला. आई-वडिलांच्या सहा मुलांपैकी एक असणाऱ्या श्रीनिवास यांना लहानपणापासून शिक्षणाचे महत्त्व आणि आर्थिक स्वातंत्र्य याचे धडे मिळाले होते. सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करणारे श्रीनिवास हे शहापूरच्या चिंतामणराव हायस्कूलमधून 55 टक्के गुण संपादन करून एसएससी उत्तीर्ण झाले. वयाच्या 18 व्या वर्षी विजापूर येथील स्टेट बँकेत त्यांना नोकरी लागली. परंतु त्यांना एमएससी ही विज्ञान शाखेची पदव्युत्तर पदवी संपादन करावयाची होती. मात्र धारवाडच्या प्राचार्यांनी त्यावर आक्षेप घेतल्यामुळे ठाणेदार यांनी थेट उपकुलगुरूंना गाठले आणि परवानगी मिळवली. दरम्यान एमएससीच्या परीक्षेसाठी श्रीनिवास यांना बँकेकडून 15 दिवसाची सुट्टी नाकारण्यात आली. तेंव्हा ठाणेदार यांनी विजापूर सोडून धारवाड गाठले.
तसेच दररोज फक्त 1 तास झोप काढून सलग 8 दिवस परीक्षेचा अभ्यास केला. दरम्यान बँकेच्या नोकरीतून आपल्याला काढून टाकण्यात आले आहे याची कल्पना देखील त्यांना नव्हती. यशस्वी लक्षाधीश उद्योजक आणि आता अमेरिकेत लोकप्रतिनिधी झालेल्या श्रीनिवास ठाणेदार यांच्या “ही श्रीची इच्छा” या आत्मचरित्राच्या पुस्तकाचा विक्रमी खप झाला आहे.