राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या असून यासंबंधी बंगळूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.
कर्नाटकातील एकूण ५७६२ ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या निवडणुकीत ३५८८४ क्षेत्रांमधील ९२१२१ जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ११३ तालुक्यातील २९३० आणि दुसऱ्या टप्प्यात ११३ तालुक्यातील २८३२ ग्रामपंचायतींची निवडणुका होणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील एकूण ४८१ ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यात निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यात ७ आणि दुसऱ्या टप्प्यात ७ अशाप्रकारे मतप्रक्रियेचे विभाजन करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील एकूण १४ तालुक्यातील 481 ग्रामपंचायतींपैकी पहिल्या टप्प्यात बेळगाव तालुक्यातील ५७, खानापूर ५१, हुक्केरी ५२, बैलहोंगल ३३, कित्तूर १६, गोकाक ३२, मुडलगी २० अशा एकूण ७ तालुक्यातील २६१ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
तर दुसऱ्या टप्प्यात सवदत्ती तालुक्यातील ४१, रामदुर्ग ३३, चिक्कोडी ३६, निपाणी २७, अथणी ४१, कागवाड ९, रायबाग ३३ अशा एकूण ७ तालुक्यातील २२० ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील एकूण २५५३१५३ मतदार मतप्रक्रियेत सहभागी होणार आहेत. या एकूण मतदारांपैकी १२९९८७० इतकी पुरुष मतदारांची संख्या आहे १२५३२८३ इतकी महिला मतदारांची संख्या आहे.
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख ७ डिसेंबर आहे तर अर्ज अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ११ डिसेंबर आहे. त्यासोबतच दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी ११ डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची तारीख असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर असणार आहे. तर अर्ज माघार घेण्याची तारीख १४ ते १९ डिसेंबर असणार आहे.