Wednesday, November 27, 2024

/

देशात कोरोनाच्या लाटेची चर्चा, तर जिल्ह्यात मात्र दिलासादायक स्थिती

 belgaum

देशात कोरोनाच्या आणखी एका धोकादायक लाटेची शक्यता वर्तविली जात असताना बेळगांवसाठी मात्र दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटत असून आज दिवसभरात अवघे 16 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 319 झाली असून आज एकाचा मृत्यू झाला आहे.

बेळगांव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 16 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून यामध्ये बेळगाव तालुक्यातील 8 गोकाक व अथणी तालुक्यातील प्रत्येकी 3 तर बैलहोंगल व सौंदत्ती तालुक्यातील प्रत्येकी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा समावेश आहे. आज बेळगाव तालुक्यातील 880500 क्रमांकाच्या 59 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने जाहीर केलेल्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज सोमवार दि. 23 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 2,68,834 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले.

जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 29,296 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 319 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 26,266 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 2,09,953 आहे.

कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 2,67,743 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी एकूण 25,473 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज सोमवारी नव्याने आढळलेल्या 16 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 2,38,756 नमुने निगेटिव्ह असून ॲक्टिव्ह केसीस 319 आहेत. त्याचप्रमाणे 2,006 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 341 रुग्णांचा मृत्यू झाला असून 24,813 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, बेळगांव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटली असली तरी अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नसल्याने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. भारताबाहेरील कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींनी अथवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरीही भारतात आलेल्या दिवसापासून 14 दिवस घरगुती विलगीकरणात रहावे, घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे संबंधितांनी स्वतःहून नजीकच्या सरकारी हॉस्पिटल अथवा 104 हेल्थ – हेल्पलाईन कॉल सेंटरशी किंवा आरोग्य सहाय्यवाणी डीएसयू बेळगाव 0831- 2424284 येथे संपर्क साधून आपली माहिती द्यावी. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. खोकला अथवा शिंक आल्यास टिश्शू पेपर किंवा रुमाल तोंडावर धरावा. प्रत्येकाने आपले हात साबण लावून पाण्याने अथवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग शक्यतो टाळावा, आदी खबरदारीच्या सूचनाही जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालयाच्या सर्व्हिलन्स युनिटने आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जनतेला दिल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.