भाषावार प्रांतरचनेत सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आज मराठी भाषिक जनतेच्या वतीने काळा दिन पाळण्यात येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणत्याही कार्यक्रमाला बंदी असल्यामुळे मराठा मंदिर येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रात जाण्याचा वज्रनिर्धार व्यक्त करत बेळगावातील सीमावासीयांनी बैठे आंदोलन छेडले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीला परवानगी देण्यात आली नाही म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठा मंदिर येथे आंदोलन छेडून अन्यायाने कर्नाटकात डांबल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध केला.
या आंदोलनात समितीच्या ज्येष्ठ नेत्यांसह सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक मंगेश चिवटे यांच्यासह राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या उपस्थित होत्या. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी,सरचिटणीस मालोजी अष्टेकर माजी आमदार मनोहर कीनेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आंदोलन स्थळी विविध भागातून आलेल्या मराठी भाषिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.मराठी भाषिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी केली.
नवरात्रीत आपण ज्या नवदुर्गांचा उत्सव साजरा करतो, त्या नवदुर्गा प्रत्येक स्त्रीमध्ये विराजमान आहेत. जर कर्नाटक सरकारची दडपशाही, हुकूमशाही आणि मराठी जनतेवरील अन्याय, अत्याचार असाच सुरु राहिला तर, याच नवदुर्गा कर्नाटक सरकारला महागात पडतील, आणि रात्रीच काय तर दिवसाही सूर्य, चंद्र, तारे दिसतील. महाराष्ट्रातील नेत्यांवर ज्यापद्धतीने टीका सुरु आहे ते कदापिही सहन करून घेतले जाणार नाही. मराठी भाषिकांच्याबाबत जी भूमिका प्रशासन ठेवत आहे ती भूमिका अत्यंत चुकीची असून सीमाभागातील मराठी जनतेला त्यांच्या मूलभूत सुविधा पुरविण्यास कर्नाटक सरकार कमी पडत असेल तर महाराष्ट्र सरकार बेळगावमधील मराठी जनतेला त्यांच्या अत्यावश्यक आणि मूलभूत सुविधा देण्यास समर्थ आहे, हे कर्नाटक सरकारने लक्षात ठेवावे, असा सज्जड दम राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाखणकर यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.
मी शरद पवार यांची प्रतिनिधी म्हणून आज सीमावासीयांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आले आहे.सीमाप्रश्न हा पवार साहेबांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.पवार साहेबांनी आंदोलनात सहभागी होऊन लाठ्या काठ्याही खाल्ल्या आहेत.कर्नाटक सरकार मराठी भाषिकावर दडपशाही आणि जुलूम करत आहे.महाराष्ट्र कायम सीमावासीयांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकण कर यांनी आपल्या भाषणात दिली.
त्या पुढे म्हणाल्या काळा दिन पाळण्यासाठी कर्नाटक सरकारने निर्बंध घातले आहेत. काळा दिन आचरणात न आणण्यासाठी अनेकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये जारी निर्बध लादले असतील तरी महाराष्ट्रात मात्र सर्व मंत्रिमंडळ आज काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर काळ्या रंगाची वस्त्रं परिधान करूनच कामकाज करीत आहेत. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा आणि हुकूमशाहीचा रुपालीताई चाखणकार यांनी निषेध नोंदविला. सीमालढ्यात सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेला सीमाप्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून, बेळगाव महाराष्ट्रात गेल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मंगेश चिवटे यांनी दिला. कर्नाटक सरकारच्यावतीने मराठी भाषिक जनतेवर दडपशाहीचा प्रकार सुरु असून मराठी जनतेवर खोट्या कोर्ट केसीस दाखल करण्याचे काम कर्नाटक सरकार करत आहे. हा लढा दडपण्यासाठी हा सारा खटाटोप आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी बेळगावमधील अनेकांनी हौतात्म्य पत्करले आहे. अजूनही लोकशाहीच्या मार्गाने लढा देऊनही न्याय मिळत नसल्याची खंत मंगेश चिवटे यांनी व्यक्त केली.
गावागावातून निषेध
कंग्राळी खुर्द ,येळ्ळूर, बेनकनहळळी, सह अनेक गावागावात निषेध व्यक्त करण्यात आला.दरवर्षी मूक सायकल फेरी असते त्यामुळे सीमाभागातील जनता सायकल फेरीत सहभागी मात्र रविवारी सीमा भागातील गावा गावात निषेध नोंदवण्यात आला.खानापूर समितीच्या वतीने देखील ठिय्या आंदोलन झाले.