बापट गल्ली येथील युवक विजय गवाणे यांच्या आत्महत्येस जबाबदार सावकारावर कडक कारवाई करावी. तसेच शहरातील आत्महत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी उपाय योजना कराव्यात या मागणीसाठी बापट गल्ली आणि परिसरातील युवक मंडळे व नागरिकांनी आज भव्य मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
बंडू केरवाडकर यांच्या सावकारी व्याजामुळे बापट गल्ली येथील विजय मनोहर गवाणे (वय 35) या युवकाने सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्या सावकारा विरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
सावकाराने अनेकांना कर्ज देऊन मनमानीपणे व्याज आकारण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यासंदर्भात बापट गल्ली येथील नवहिंद युवक मंडळ, कालिकादेवी युवक मंडळ, कालिका देवी महिला मंडळ आणि पंच मंडळींच्या एक मताने आज शहरात भव्य मोर्चा काढून उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
त्याचप्रमाणे शहरात अलीकडे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आज बुधवारी सकाळी जोरदार निदर्शने करत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये संदीप भोसले, शंकर पाटील, विकास गवस, ज्योतिबा राजाई, राजू शेट्टी, उदय पाटील, आर. पी. जाधव विलास पोटे आदींसह बापट गल्ली परिसरातील उपरोक्त युवक मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बापट गल्ली पंच मंडळी, गवाणे कुटुंबीय, व्यापारी बंधू आणि बहुसंख्य महिला व नागरिक सहभागी झाले होते. “विजय गवाणे याला न्याय द्या आणि त्या सावकाराला कडक शासन करा” अशा मागणीचे फलक हातात धरून निघालेले मोर्चाच्या अग्रभागी असलेले मोर्चेकरी सार्यांचे लक्ष वेधून घेत होते.