मुलांना निसर्गाकडे घेऊन चला आणि त्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून द्या. भविष्यात निसर्गाचे आणि पर्यावरण पर्यावरणाचे रक्षण करण्यास त्यांचा हातभार महत्त्वाचा ठरणार आहे. याच भूमिकेतून अमूल्य बुंद आणि धरणी फाउंडेशन संयुक्त विद्यमाने मुलांसाठी एक अनोखे शिबिर घेण्यात येत आहे.
अमूल्य बुंदीच्या आरती भंडारे यांच्या संकल्पनेतून हे शिबिर होत आहे. लाॅक डाऊनच्या काळात शाळा नसल्याने मुले मोबाईल आणि टीव्हीच्या स्क्रीन समोर सतत बसून राहतात, ही सार्वत्रिक तक्रार आहे.
मात्र केवळ चर्चा न करता या मुलांना त्यापासून परावृत्त करत निसर्गाच्या सानिध्यात आणण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात कोणतेही साहित्य मुलांनी आणावे अशी सक्ती नसून स्वयंपाक घरातीलच भाजी, फळे यांच्या बिया, नारळाचा काथ्या यांचा उपयोग करून पर्यावरणाचे महत्त्व समजावून देण्यात येत आहे. लहान मुलांना निसर्गाची आवड लावणे हा या शिबिराचा हेतू आहे.
शाळेत ज्या गोष्टी अभ्यासक्रमातून शिकवल्या जात नाहीत त्या या शिबिरात शिकवण यावर भर देण्यात आला आहे. उदाहरणार्थ सेंद्रिय खत तयार करणे, कचऱ्याचे विघटन करणे, उद्यानाची जैवविविधता टिकवणे आदींचे प्रशिक्षण शिबिरात देण्यात येत आहे. शिबिराबाबत आयोजक म्हणतात परदेशात मुलांना बागकामाची आवड लावण्याजोगा अभ्यासक्रम असतो, शिवाय त्यांना प्रत्यक्ष तसे प्रशिक्षणही मिळते. आपल्याकडील अभ्यासक्रमात अशा विषयांना प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे मुले बागकाम असो किंवा पर्यावरणाचे रक्षण असो यापासून दूर राहतात.
जर लहान मुलांना विद्यार्थीदशेतच पर्यावरणाचे आणि निसर्गाचे महत्त्व समजावून दिले, त्याचे उपयोग सांगितले, त्याची आवड निर्माण केली तर पुढे हीच मुले निसर्गाचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विशेष म्हणजे कोविड -19 चे सर्व नियम पाळून म्हणजेच मास्क घालून, सामाजिक अंतर राखून हे शिबिर घेण्यात येत असल्याचे आरती भंडारे यांनी सांगितले.