बहुचर्चित आणि उत्सुकता ताणलेल्या डीसीसी बँकेच्या ३ जागांसाठी निवडणुका आज पार पडल्या असून या निवडणुकीत २७ मताधिक्याने खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी विजय मिळविला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी बातचीत केली. यावेळी भाजप प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाना त्यांनी उत्तर देणे टाळले. यामुळे अजूनही त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत संभ्रम आहे.
२०२० ते २०२५ या काळासाठी डीसीसी बँकेवर संचालक म्हणून निवडून येण्याची हि आपली चौथी वेळ असून माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा आभारी असल्याचे ते म्हणाले. मी याआधीही या निवडणुकीत निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला होता. तसेच विरोधकांना तीव्र टक्कर देण्याचाही विश्वास व्यक्त केला होता. याआधीही तत्कालीन आमदार प्रल्हाद रेमाणी हे माझ्याविरोधात या निवडणुकीत उतरले होते. परंतु त्यावेळीही मीच निवडून येण्याचा निर्धार केला होता.
माझ्या विरोधातील सर्व राष्ट्रीय पक्षांनी मला या निवडणुकीत पराभूत करण्याचा निर्धार केला होता. परंतु खानापूर पीकेपीएस क्षेत्रातील माझ्या कार्याची दखल घेऊन मतदारांच्या विश्वासाला सार्थ ठरल्यामुळे आज पुन्हा मी या बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. ५२ पैकी केवळ २७ मते पडली असली तरी उर्वरित संघही माझेच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
विद्यमान आमदारांनी पहिल्यांदाच या निवडणुकीत उतरून जोरदार टक्कर दिली असे इतरांना वाटू शकते. परंतु त्या विद्यमान आमदार आहेत आणि मी माजी आमदार आहे. केवळ विद्यमान आमदारच नाही तर इतर पक्षही माझ्या विरोधात उभे होते. या सर्वांना टक्कर देऊन माझे मताधिक्य हे श्रेष्ठच असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचा मला पाठिंबा होता. यात कोणताही राजकीय द्वेष आणि स्वार्थ नसून गेल्या १५ वर्षात मी केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले.
खानापूरच्या राजकारणाची पुढील दिशा ठरविणारी ही निवडणूक असून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसून आपण निवडणुकीच्या कामात गुंतलो होतो. राजकारणात आल्यापासून जनतेच्या अडचणी सोडविणे आणि गरजूंना मदत करून आपल्या क्षेत्राचा विकास करणे हेच माझे ध्येय असल्याचे मत त्यांनी बोलून दाखविले. परंतु भाजप प्रवेशाबद्दल आणि भाजप नेत्यांनी केलेल्या विधानांबद्दल त्यांनी हेतुपुरस्सर बोलणे टाळले.