दरवर्षी पावसाळ्यात बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे आसपासच्या पिकांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते मात्र यंदा एका युवा शेतकऱ्यांने एक साधी परंतु नामी शक्कल लढवून बळ्ळारी नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्याद्वारे परिसरातील भात पिकांना जीवदान मिळवून दिल्यामुळे हा एक कौतुकाचा विषय झाला आहे.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये बल्लारी नाल्याला पूर येऊन आसपासच्या शेत जमिनीतील पिकांचे विशेष करून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हुबळी धारवाडकडे जाणाऱ्या महामार्गावरील पुलाखाली मोठ्या प्रमाणात गवत उगवून केर कचरा व गाळ साठत असल्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण होत होती. यंदा मात्र गणेशपेठ जुने बेळगाव येथील लक्ष्मण बाबु पाटील या युवा प्रगतशील शेतकऱ्याने एक नामी शक्कल लढविल्यामुळे बळ्ळारी नाल्याच्या पुराचा धोका जवळपास नाहीसा झाला आहे.
बळ्ळारी नाल्याला पूर येऊन परिसरातील पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी दर वर्षी शेतकऱ्यांकडून केली जाते. प्रशासन आणि महापालिका देखील या संदर्भात वेगवेगळ्या उपायोजना करत आली असली तरी पुराचा धोका “जैसे थे” होता. युवा शेतकरी लक्ष्मण बाबु पाटील याने मात्र आपले डोके लढवून एक साधी सोपी परंतु नामी युक्ती शोधून काढली. विश्वास बसणार नाही परंतु त्याने शेतातील अनावश्यक गवत जाळण्यासाठी ज्या रासायनिक औषधाची फवारणी केली जाते त्या औषधांद्वारे पूर परिस्थिती जवळपास आटोक्यात आणली आहे.
लक्ष्मणने महामार्गाच्या ठिकाणी पुलाखाली ज्याठिकाणी बळ्ळारी नाला तुंबत होता त्या ठिकाणच्या गवत व झुडपांवर संबंधित रासायनिक औषधांची फवारणी केली. परिणामी अल्पावधीत गवत व झुडपे मुळापासून कुजून नष्ट झाल्यामुळे नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग सुकर झाला आहे.
कोठेही अडकाठी न होता पुलाखालून नाल्याचे पाणी वाहू लागल्यामुळे सध्या बळ्ळारी नाला परिसरातील शेकडो एकर भात पिकामधील पुराचे पाणी ओसरले आहे. यामुळे दिलासा मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून जो -तो लक्ष्मण पाटील याची मुक्तकंठाने स्तुती करताना दिसत आहे.