महिला प्रवाशांना सक्रिय सुरक्षा व्यवस्था देण्याच्या उद्देशाने रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) “मेरी सहेली” हा आपला सुरक्षा उपक्रम वाढवताना आता तो 10 पॅसेंजर रेल्वे गाड्यांसाठी सुरू केला आहे. यामध्ये केएसआर – बेळगांव – केएसआर पॅसेंजर रेल्वे गाडीचाही समावेश आहे.
“मेरी सहेली” या उपक्रमाचे मुख्य ध्येय महिला प्रवाशांना रेल्वेच्या संपूर्ण प्रवासादरम्यान सुरक्षा देणे हा आहे. या उपक्रमांतर्गत महिला पोलीस उपनिरीक्षक आणि महिला कॉन्स्टेबल असणारे आरपीएफचे पथक प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी रेल्वेच्या महिलांच्या डब्यासह सर्व डब्यांमध्ये जाऊन किती महिला एकट्याने प्रवास करत आहेत त्याची माहिती घेईल.
एकट्याने प्रवास करणाऱ्या या निवडक महिलांना रेल्वे प्रवासादरम्यान घ्यावयाच्या सर्व खबरदारीची माहिती दिली जाईल. तसेच कांही समस्या निर्माण झाल्यास 182 या हेल्पलाईन नंबरसह आरपीएफ चा संपर्क क्रमांक देखील दिला जाईल.
एकट्या-दुकट्या महिला, वयोवृद्ध महिला आणि आपल्या मुलांसह एकाकी प्रवास करणाऱ्या महिला यांच्यासाठी रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्टेशन असुरक्षित जागा बनू नयेत याची काळजी आता घेतली जात आहे. अशा ठिकाणी समाजकंटक एकट्या-दुकट्या महिलांना हेरून त्यांची लुबाडणूक अथवा त्यांच्याशी गैरवर्तन करत असतात. यासाठी “मेरी सहेली” या उपक्रमांतर्गत यापुढे रेल्वे सुरक्षा दल व्यवसायिक विभाग कर्मचाऱ्यांच्या मदतीने एकट्या-दुकट्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणार आहे.
एकंदर यापुढे एकट्या-दुकट्या महिला रेल्वेचा प्रवास निर्धास्तपणे करता येणार आहे. कारण सर्व ती खबरदारी घेऊन देखील जर समाजकंटकांना तोंड द्यावे लागले तर महिला प्रवाशांना रेल्वे सोबत प्रवास करणाऱ्या आरपीएफ एस्कॉर्ट टीमचा संपर्क क्रमांक उपयोगी पडणार आहे. त्याचप्रमाणे आणीबाणीच्या वेळी वापरता यावा यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर (182) देखील त्यांच्याकडे असणार आहे.