विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने (व्हीटीयु) यंदाच्या नूतन शैक्षणिक वर्षापासून बदलत्या तंत्रज्ञानाशी निगडित महत्वाचे असे तीन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातर्फे नव्या शैक्षणिक वर्षापासून बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स अँड बिझिनेस सिस्टीम्स, बीटेक इन मेकॅनिकल अँड स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि बी टेक इन रोबोटिक अँड ऑटोमेशन हे तंत्रज्ञानाशी निगडित नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. एआयसीटीई म्हणजेच अखिल भारतीय तांत्रिक महामंडळाने या अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे.
या अभ्यासक्रमाच्या प्रत्येक विभागासाठी 30 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. बी टेक इन कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टिम्स अंतर्गत अनॅलिटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बौद्धिक संपदा यावर आधारित अभ्यासक्रम असून आयटी क्षेत्राला उपयुक्त ठरतील असे विद्यार्थी तयार करण्याचे ध्येय आहे. टीसीएसतर्फे विद्यार्थ्यांना इंटरंशिप ही देणार आहे. मेकॅनिकल अँड स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग अंतर्गत 21व्या शतकाची गरज लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत इंजिनीयर तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. उत्पादन प्रक्रिया उत्पादन पद्धत आणि सलग्न अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे.
बी टेक रोबोटिक्स अँड ऑटोमेशनमध्ये तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ घेत रोबोटिक्स इंजिनियर, रोबोटिक वेल्डिंग, मोबाईल रोबोटिक या अभ्यासक्रमावर भर दिला जाणार आहे. काळाची गरज लक्षात घेऊन विविध आस्थापनांमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचा अवलंब वाढत आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कृषी, खाण, अवकाश आरोग्य आणि लष्करात अशा विविध क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत.
एकंदर या तीनही अभ्यासक्रमांमध्ये व्यवस्थापन विज्ञान, मानवाधारित कौशल्य व मानवी मूल्ये यांच्यावर भर देण्यात आला आहे. काळाची गरज लक्षात घेऊन समस्यांवर उपाय शोधण्याची किंवा त्या सोडवण्याची गरज असून त्या पद्धतीने या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.