जिल्हा पंचायतीच्या विविध स्थायी समित्यांच्या नवीन सदस्यांची निवडणूक शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जिल्हा स्थायी समितीसाठी नूतन सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या प्रमुख उपस्थितीसह राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, एमएलसी प्रो. साबण्णा तळवार यांच्या उपस्थितीत ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. उपसचिव एस. बी. मुळ्ळळ्ळी यांनी नूतन सदस्यांची नवे जाहीर केली.
या निवडणुकीत २ जागा भाजपाला तर २ जागा काँग्रेसला मिळाली आहे तर अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनाही समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.
सामान्य न्याय समितीच्या अध्यक्षपदी जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांची निवड झाली असून सदस्यपदीं महांतेश मगदूम, सरस्वती पाटील, सिद्दू नराटे, सुदर्शन खोत, सुजाता चौगुले, कस्तुरी कमती यांची निवड करण्यात आली आहे.
तर शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीवर सिद्धप्पा मदूकन्नवर, सुरेश नायक, लक्ष्मी कुरुबर, बसवराज बंडीवड्डर, मल्लप्पा हिरेकुंबी, पवार राजेंद्र रामप्पा, शशिकला सन्नक्की यांची निवड झाली. तसेच कृषी व औद्योगिक स्थायी समितीच्या सदस्यपदी माधुरी शिंदे, अजित देसाई, सुमन पाटील, निंगाप्पा पकांडी, लावण्य शिलेदार, मीनाक्षी जोडट्टी आणि निंगप्पा अरकेरी यांची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे वित्तीय लेखा परिक्षण व नियोजन समितीच्या स्थायी समिती सदस्यपदी जितेंद्र मादर, गुरप्पा दास्याळ, कृष्णाप्पा लामणी, रमेश देशपांडे, अनिल म्याकलमार्डी, शिवगंगा गोरवणकोळ्ळ यांची निवड झाली.
एकंदरीत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात आली. यादरम्यान माजी आमदार संजय पाटीलही सभागृहात उपस्थित होते. संजय पाटील यांच्या उपस्थितीमुळे सभागृहात अनेक उलटसुलट चर्चा सुरु होत्या.