भारतीय हवाई दलाच्या प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण काळात समर्थपणे नवनवीन कला शिकून भविष्यात त्यांचा परिणामकारक वापर केला पाहिजे, असे मार्गदर्शनपर विचार भारतीय हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल आर. डी. माथूर यांनी व्यक्त केले.
बेळगांवातील सांबरा एअरमन प्रशिक्षण केंद्राला 20 ते 22 ऑक्टोबर दरम्यान दिलेल्या तीन दिवसांच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते.
सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कुलचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. डी. मुकुल यांनी एअर कमांडिंग इन चीफ आर. डी. माथूर यांचे स्वागत केले.
आपल्या तीन दिवसांच्या भेटी दरम्यान एअर मार्शल माथूर यांनी सांबरा ट्रेनिंग स्कुलमध्ये एअरमन प्रशिक्षणार्थीना देण्यात येणाऱ्या ट्रेनिंगचा आढावा घेतला. तसेच प्रशिक्षणार्थींच्या खडतर प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या पायाभूत प्रकल्पांची पाहणी करून त्यांची माहिती जाणून घेतली.
त्याचप्रमाणे वायू सैनिकांशी संवाद साधून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानात स्वतःला पुढे कसे ठेवता येईल, भारतीय हवाई दलाचा उच्च दर्जा कसा अबाधित राखता येईल याबाबत मार्गदर्शन केले.