टिळकवाडी म्हणजे ठळकवाडी. मोठे उद्योजक, अधिकारीवर्ग तसेच उच्चभ्रूवर्ग अशा ठळक व्यक्तींसाठी ब्रिटिशांनी वसविलेले उपनगर अशी ओळख या भागाला आहे. पहिल्यापासूनच बेळगांव शहरातील एक महत्त्वाचा उपविभाग म्हणून टिळकवाडीकडे पाहिले जाते. येथील मालमत्तांच्या दरांमध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत असून टिळकवाडी परिसरातील सर्वात महागडा रस्ता म्हणून शुक्रवार पेठचा उल्लेख करावा लागेल.
अतिशय शांत वातावरण आणि सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध असल्याने टिळकवाडीत राहणे अनेक जण पसंत करतात. टिळकवाडीमधील जागांच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून याबाबतीत शुक्रवार पेठ हा या भागातील सर्वात महागडा रस्ता आहे. गोवावेस स्विमिंग पूल ते पहिले रेल्वे गेट पर्यंतच्या या रस्त्यावरील निवासी मालमत्तांचा 4,500 रु तर व्यापारी मालमत्तांचा दर 6,300 रु. प्रति चौरस फूट असा झाला आहे. त्याखालोखाल सोमवार पेठचा दर असून तेथील निवासी मालमत्तांचा दर 4,000 रु. प्रति चौरस फूट आणि व्यापारी मालमत्तांचा दर 5,600 रु. प्रति चौरस फूट असा आहे. टिळकवाडी येथील मुख्य वर्दळीचा रस्ता असणारा खानापूर रोड तिसऱ्या क्रमांकावर आहे. या रस्त्यावरील निवासी मालमत्तांचे दर 3,940 रु. तर व्यापारी जागांचे दर 5,516 रु. प्रति चौरस फूट निश्चित करण्यात आले आहेत.
टिळकवाडीमध्ये जागा मिळणे अवघडच असून गेल्या कांही वर्षात या परिसरातील जुनी कौलारू घरे जाऊन अपार्टमेंट उभी झाली आहेत. त्यामुळे फ्लॅटची मागणी वाढली आहे. 1997 साली टिळकवाडी येथील निवासी मालमत्तांचे दर केवळ 111 रु. प्रतिचौरस फूट तर व्यापारी जागांचे दर 213.07 रु. प्रति चौरस फूट इतके होते. तेच दर आता 13 वर्षानंतर 2020 मध्ये निवासी मालमत्तेसाठी 4,500 रु. तर व्यापारी मालमत्तेसाठी 6,300 रु. प्रति चौरस फूट निश्चित करण्यात आले आहेत.
टिळकवाडी येथील आगरकर रोड आणि काँग्रेस रोडचे निवासी मालमत्तांचे दर 3,438 रु. आणि व्यापारी मालमत्तांचे दर 5,007 रु. प्रति चौरस फूट निश्चित करण्यात आले आहेत. शुक्रवार पेठ व सोमवार पेठ वगळता मंगळवार पेठ, बुधवार पेठ व गुरुवार पेठ येथील निवासी मालमत्तांचे दर 2,900 रु. प्रति चौरस फूट आणि व्यापारी मालमत्तांचे दर 4,010 रु. प्रति चौरस फूट इतके आहेत. आरपीडी रोडवरील निवासी मालमत्तांचा दर 2,360 रु. प्रति चौरस फूट तर व्यापारी जमिनींचा दर 3,304 रु. प्रति चौरस फूट निश्चित करण्यात आला आहे.
टिळकवाडी परिसराचा विस्तार वाढत चालला आहे. येथील रस्त्यांचे रुंदीकरण तसेच काँक्रीटीकरण सुरू आहे. विविध माॅल्स या ठिकाणी झाले आहेत. त्याचबरोबर खानापूर रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या परिसराचे महत्त्व अधिकच वाढले आहे. गोवावेस स्विमिंग पूलपासून पहिल्या रेल्वे गेटपर्यंत विविध शोरूम्स झाल्यामुळे या रस्त्याला लागून असलेल्या खुल्या जागांचे दर झपाट्याने वाढू लागले आहेत. मुद्रांक व नोंदणी खात्याने याबाबत सर्वेक्षण करून वाढीव बाजारमूल्यांचा तक्ता जाहीर केला आहे.