पहिले रेल्वे गेट टिळकवाडी येथे रेल्वेमार्ग शेजारी आणि महांतेशनगर आर्ट गॅलरी नजीक बहुमजली कार पार्किंग इमारत उभारणीसाठी बेळगांव स्मार्ट सिटी लिमिटेडतर्फे निविदा काढण्यात आल्या आहेत.
पहिले रेल्वे गेट टिळकवाडी येथील बहुमजली कार पार्किंग इमारतही पीपीपी आधारावर (डीबीएफओटी) उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या बेसमेंटच्या भागात कार पार्किंग असणार आहे. तळमजला आणि पहिला मजला रिटेल असणार असून दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर पुन्हा कार पार्किंग असणार आहे.
या पद्धतीने या बहुमजली कार पार्किंग इमारतीमध्ये हे एकूण 130 कारगाड्या (किरकोळ वापरासाठी 33 अधिक सर्वसाधारण वापरासाठी 97) पार्क करता येणार आहेत. या ठिकाणी स्टॅक कार पार्किंगची सोय असणार आहे. स्टॅक पार्किंगमध्ये सर्वसाधारणपणे एकाहून अधिक कारगाड्या सिंगल पार्किंग लॉटमध्ये पार्क करता येतात.
स्टॅक पार्किंगमध्ये पहिली कार लिफ्टद्वारे वर उचलली जाते आणि त्या खाली दुसरी कार पार्क केली जाते. टिळकवाडी येथील इमारतीच्या नियोजित जागेच्या ठिकाणी मल्टी लेव्हल बेसमेंट पार्किंग बरोबरच जमिनीच्यावर व्यावसायिक विकास देखील केला जाणार आहे.
महांतेशनगर येथील मल्टियुटिलिटी फॅसिलिटेशन सेंटरची इमारत देखील पीपीपी आधारावर (डीबीएफओटी) उभारली जाणार आहे. या इमारतीच्या बेसमेंटच्या जागी आच्छादित पार्किंग असेल. त्याचप्रमाणे तळमजला व पहिला मजला रिटेल असणार असून दुसऱ्या मजल्यावर मल्टी युटिलिटी फॅसिलिटेशन सेंटर असेल. या इमारतीमध्ये 77 अधिक 39 अशा एकूण 116 (बेसमेंट आणि सरफेस पार्किंग) कारगाड्या पार्क करता येणार आहेत.