बेळगाव तालुक्यातील किणयेत येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात बुधवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून सुमारे तीन लाखांहून अधिक सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
चोरट्यांनी आता पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठेवले आहे. बुधवारी रात्री ग्रामस्थांनी लक्ष्मी मंदिरात भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. हा कार्यक्रम रात्री सुमारे 12 ते 1 या दरम्यान संपला. त्यानंतर नागरिक आपापल्या घरी गेले.
मध्यरात्री दोन ते पहाटे चार या वेळेत चोरट्यांनी मंदिरातील वरच्या मजल्यावर चढून लॉक फोडून चोरी केली आहे. बनावट दागिने तेथेच ठेवून आणि फोडलेली पेटी तेथेच टाकून पोबारा केला आहे. सुमारे साडेसहा तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लांबविली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून या घटनेची माहिती बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात देण्यात आली आहे.
किणये येथील श्री लक्ष्मी मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून पाहिले जाते. दरम्यान या मंदिरात चोरीची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. चोरट्यांनी पुन्हा मंदिरांना लक्ष बनविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत तीन ते चार लक्ष्मी मंदिर फोडण्यात आल्याच्या घटना उघडकीस आले आहेत.
बेळगाव तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. या चोरीमुळे नागरिक भयभीत झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे