कणकुंबी (ता. खानापूर) गावातील एका 15 महिन्याच्या बालकाच्या हृदयातील पडद्याला पडलेल्या जन्मजात छिद्राचा दोष यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे दूर करून डॉक्टरांनी त्या बालकाला जीवदान दिल्याची घटना नुकतीच केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये घडली.
कणकुंबी (ता. खानापूर) येथील घरची आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या एका 15 महिन्याच्या बालकाच्या हृदयात व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (व्हीएसडी) हा दोष निर्माण झाला होता. व्हीएसडी म्हणजे सदर बालकाच्या हृदयातील खालच्या दोन कप्प्यामधील पडद्याला जन्मजात छिद्र पडल्यामुळे त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच रोटरी क्लबच्या सदस्यांनी या आजारी मुलाला केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
सदर बालकाला छातीत संसर्ग होऊन सतत खोकला येत होता. खोकल्याने घामाघूम होणाऱ्या या बालकाला श्वास घेतानाही त्रास व्हायचा. त्याचे वजनही घटले होते. सखोल तपासणीअंती हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण तांब्रलीमठ यांनी या बालकाच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान करून तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज व्यक्त केली.
केएलई हॉस्पिटलमध्ये सुमारे 3 तासाच्या अवघड पण यशस्वी शस्त्रक्रियेअंती बालकाच्या हृदयातील ते छिद्र बंद करण्यात आले. ही शस्त्रक्रिया जर झाली नसती तर सदर बालकाची फुफ्फुसं आणि हृदय निकामी झाले असते. कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीत या पद्धतीची अवघड शस्त्रक्रिया करणे हे एक मोठे आव्हान होते. परंतु हॉस्पिटलच्या सर्जिकल टीम आणि आयसी यू पोस्ट ऑपरेटिव्ह टीमने विशेष खबरदारी घेऊन शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रिये अंती उपचारानंतर संबंधित बालकाला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. या शस्त्रक्रियेसाठी रोटरीच्या ग्लोबल ग्रँटमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
डॉ. तांब्रलीमठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हृदयशस्त्रक्रिया करून जीवदान दिलेले हे आत्तापर्यंतचे 5 वे बालक आहे. यापूर्वी डॉ. तांब्रलीमठ यांनी 4 बालकांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. यशस्वी शस्त्रक्रिया त्या बालकाचा जीव वाचवल्याबद्दल डॉ. अल्पेश तोपराणी आणि रोटरी क्लबच्या सदस्यांनी केएलई हॉस्पिटलचे कौतुक करून धन्यवाद दिले आहेत.