पंचमशाली समाजाला शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात २ए या श्रेणीत आरक्षण दिले जावे, केंद्र सरकारच्यावतीने इतर हिंदू समाजातील इतर मागासवर्गीयांच्या यादीत पंचमशाली समाजाचा समावेश करावा, या मागणीसाठी बेळगाव येथे सुवर्णविधान सौध समोर २४ ऑकटोबर रोजी एकदिवसिय उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती पंचमशाली पिठाचे जयमृत्युंजय स्वामी यांनी दिली आहे.
बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, पंचमशाली समाजातील अनेक लोक शेती आणि नोकरीवर अवलंबून आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या पंचम समाजाला नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात आरक्षण मिळायला हवे. यासाठी सोमवार दि. २४ ऑकटोबर रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यँत सुवर्णविधानसौधसमोर एकदिवसीय उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सरकारने ठरवून दिलेल्या कोविड-१९ मार्गसूचीनुसार मास्क परिधान करण्यासह इतर नियम आणि अटींचे पालन करून पंचमशाली समाजातील जिल्हास्तरीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला पंचमशाली समाजाचे बसवराज रोट्टी, राजशेखर मेणसिनकाई, रुद्राण्णा चंदरगी, म्हणतेस हल्लूर, डॉ. रवी पाटील, बसनगौड चिकनगौडर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.